व्हायरल
मुख्य पाईपलाइनवरच रोवला पोल…..!
केज दि.२९ – मागच्या दोन दिवसांपूर्वी केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उमरी रोड कडे जाणाऱ्या वळणावर रात्रीच्या वेळेस एका वाहनाने धडक दिल्याने मुख्य विद्युत वाहिनीचा पोल कोसळला. आणि त्यामुळे इतरही दोन पूल वाकले. मात्र सदरील पोल बसवण्यात जरी आलेले असले तरी आता दुसरीच समस्या निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी एक पोल रोवण्यात आला आहे त्याच्या खाली केज शहरातील मुख्य पाईपलाईन फुटल्याने नवीनच प्रश्न निर्माण झाला आहे. तर केज नगरपंचायत ला पोल रोवलेलाही माहीत नाही अन पाइपलाइन फुटलेलीही माहीत नाही.
मागच्या दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने उमरी रोडवर असलेल्या मुख्य विद्युत वाहिनीच्या पोलला धडक दिली. त्यामध्ये सदरील पोल पूर्णपणे खाली पडला. आणि त्याचबरोबर इतर दोन पोलही वाकले होते. मुख्य वाहिनी असल्याने महावितरण ने तात्काळ पूल बसवण्याचे काम हाती घेतले. मात्र आता एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे. तहसीलच्या समोर जो पोल रोवला आहे त्याच्या खालीच मुख्य पाईपलाईन असल्याने ती नादुरुस्त झाली आहे. आणि विशेष म्हणजे सदरील पोल रोवत असताना त्या ठिकाणाहून पाणीही आले होते. तरीही त्या ठिकाणी पोल रोवण्यात आल्याने आता केजच्या बऱ्याच भागातील नागरिकांना निर्जळीचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.
दरम्यान, सदरील पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी तो पूल पुन्हा काढण्याची आवश्यकता असून त्यामध्ये किमान दोन ते तीन दिवसाचा अवधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सदरील पाईपलाईन द्वारे पाणी सोडणे शक्य नाही.मात्र त्या ठिकाणी पाईपलाईन फुटल्याचे लक्षात आल्यानंतरही त्या ठिकाणीच पोल रोवला हे मात्र विशेष असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कौतुकच झाले पाहिजे.सदरील प्रश्नी नगरपंचायत चे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तात्काळ दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना देण्यात येतील असे सांगितले.