राजकीय
खा.रजनी ताई पाटील यांचा मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा…..!
केज दि.३० – मागच्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे.ठिकठिकाणी साखळी उपोषणास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी आंदोलन तीव्र होत चालले आहे.राज्यातील हजारो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. शेकडो राजकीय नेते आंदोलनास सक्रिय पाठिंबा देत आहेत. त्याच अनुषंगाने राज्यसभेच्या खासदार रजनी ताई पाटील यांनीही आरक्षण आंदोलनास संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.
खा.रजनी ताई पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, मागील दोन महिन्यांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासह काही प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे मौजे अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे उपोषण करत आहेत. सद्या ते दुसऱ्यांदा आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून मराठा समाजाची असलेली प्रमुख मागणी मराठा व कुणबी मराठा हे एकच असून महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण व कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी माझा या मागणीला पुर्णपणे पाठिंबा आहे.
आपण नेमलेल्या न्या. शिंदे समितीला मोठया प्रमाणावर पुरावे समाजाने सादर केले आहेत. व मराठा समाज हा बहुतांशी शेतकरी आहे. मात्र शेती पुर्णपणे निसर्गावर अवलंबून झाल्याने दरवर्षी कोणत्या न कोणत्या कारणाने शेती नापीक होत आहे. मराठा समाजातील मुल, मुली आज उच्च शिक्षीत होऊनही त्यांना केवळ आरक्षण नसल्याने याचा लाभ मिळत नाही. दरम्यान, आपण मराठा समाजाच्या मागणीचा विचार करता महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाने केलेली मागणी लवकरात लवकर मार्गी लावावी. मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दररोज खालावत चालली असून याची गांभीर्याने दखल घ्यावी. व मराठा समाजाला आरक्षण तात्काळ जाहीर करावे. जेणे करुन आजपर्यंतच्या आंदोलनास न्याय मिळेल.