महाराष्ट्र
दिवाळीत महागणार एसटीचा प्रवास…..!
बीड दि. 4 – मागच्या चार दिवसांपासून सामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी काल धावल्यानंतर आता दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांसाठी लालपरीचा प्रवास महागणार आहे. दि.८ ते २७ नोव्हेंबर पर्यंत १० टक्के भाडेवाढीचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आला. २० दिवसांसाठी ही भाडेवाढ असेल.
एसटी महामंडळाच्या परिवर्तनशिल भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने भाडेवाड करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुट्टीच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात भाडेवाढीबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ८ तारखेपासून २७ नोव्हेंबर पर्यंत एसटीचे १० टक्के भाडेवाढ राहणार आहे. दरम्यान, मागच्या दोन वर्षापासून दिवाळीत १० टक्के भाडेवाढ करण्यात येते. तत्पूर्वी १५ ते २० टक्के भाडेवाढ हंगामामध्ये असायची आता मात्र ही भाडेवाढ १० टक्क्यांवर आली आहे. २० दिवसांसाठी प्रवाशांचा लालपरीतून प्रवास महागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बस वगळता सर्व बसेसचा प्रवास महागणार आहे.