संपादकीय
रस्ते कामाकडे केज नगरपंचायतसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ”उंटावरून शेळ्या”…..!
डी डी बनसोडे
November 12, 2023
केज दि.१२ – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केज शहरामध्ये सध्या कांही रस्त्यांचे काम सुरू आहे. यामध्ये मंगळवार पेठ, रोजा मोहल्ला आणि उमरी रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. मात्र ज्या नियमाने आणि निकषांनी सदरील काम होणे गरजेचे आहे तशाप्रकारे काम होताना दिसून येत नाही. सदरील काम हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत आहे. मात्र दोन्हीही यंत्रणेचे सध्या या कामाकडे कसल्याही प्रकारचे लक्ष असल्याचे दिसून येत नाही.
केज शहरामध्ये दोन्ही बाजूने मोठ मोठ्या वसाहती असलेल्या 33 फुटाच्या उमरी रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. सदरील काम हे 14 कोटी 66 लाख 44000 एवढ्या रक्कमेचे काम होत आहे. मात्र एवढे कोट्यावधी रुपये खर्च करूनही काम सुमार दर्जाचे होताना दिसत आहे. आणि एवढेच नव्हे तर अंदाजपत्रकामध्ये आणि प्रकल्प मंजुरी पत्रामध्ये ज्या ठिकाणाहून कामाची सुरुवात व्हायला पाहिजे तिथून न होता वेगळ्याच ठिकाणाहून कामाची सुरुवात झाल्याने सदरील भागातील रहिवासी संभ्रमात आहेत. रस्ते विकास प्रकल्पांतर्गत होत असलेले काम येडबा रोडे यांचे घर ते खुर्शीद भाई यांच्या प्लॉटपर्यंत नमूद करण्यात आलेले आहे. मात्र सदरील काम येडबा रोडे यांच्या घरापासून सुरू न होता हे काम सदाशिव गाढवे यांच्या घरापासून सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे सदरील कामाची मंजुरी ही येडबा रोडे यांच्या घरापासून असताना अन्य ठिकाणाहून काम कसे सुरू करण्यात आले ? असाही प्रश्न आहे.
वास्तविक पाहता येडबा रोडे ते सदाशिव गाढवे यांच्या घरापर्यंत अगोदरच पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण झालेले आहे. तसेच नगरपंचायतने ना हरकत प्रमाणपत्र जेव्हा दिले त्यामध्ये अतिक्रमण विरहित काम अशा प्रकारचा ठराव घेण्यात आलेला आहे. मात्र 33 फुटाचा रस्ता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोजमापाचा होत असल्याने व नाल्यांनाही नागमोडी वळणे दिल्या गेल्याने अतिक्रमण विरहित काम हे आहे का असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे. यामध्ये नेमक्या कुणाच्या अतिक्रमानाला वाचवण्यात येत आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाने उंटावरून शेळ्या राखण्याचे काम सुरू केले असून ज्या गुत्तेदाराला हे काम दिले आहे त्याच्याच मनावर हे काम होत असून स्थानिक स्वराज्य संस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळे झाक करताना दिसून येत आहेत.
दरम्यान, सुमारे पंधरा कोटी रुपये खर्च या रस्त्यावर होणार आहे. आणि पंधरा कोटी रुपये खर्चून जर रस्ता गुणवत्ता पूर्ण आणि अतिक्रमण विरहित नाही झाला तर कायमस्वरूपी ही समस्या राहणार आहे. त्यामुळे सदरील प्रभागातील रहिवाशी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायत ला रितसर नेवदन देऊन काम नियमाने, गुणवत्तापूर्ण आणि अतिक्रमण विरहीत करण्याची मागणी करणार आहेत.