आरोग्य व शिक्षण
केज शहरात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न…..!
केज दि.८ – शहरातील रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालय व रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माध्यमिक गटातुन कुमारी आदिती बाळासाहेब सोळंके या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शहरातील रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. यामध्ये तालुक्यातील बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक साधनांचा कौशल्यपूर्ण वापर करून विविध प्रयोग दाखवले गेले. त्याच अनुषंगाने शहरातील शारदा इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थिनीने अंध व्यक्तींसाठी एक चष्मा प्रदर्शनात मांडला होता. ज्या व्यक्तीला शंभर टक्के दिसत नाही अशा व्यक्तींसाठी हा चष्मा अतिशय उपयुक्त असल्याचे यावेळी दिसून आले. सदरील चष्मा हा अंध व्यक्तीने परिधान केल्यानंतर समोरून एखादे वाहन आले तर त्याचीही माहिती देतो. तसेच त्याच्यात जीपीएस सिस्टिम बसवल्याने नेमका तो व्यक्ती कुठल्या भागात आहे हे कुटुंबीयांना कळण्यासाठी सोपे होणार आहे. तर सदरील चष्म्याला कॅमेराही असल्याने जीपीएस प्रणाली अगदी उत्तमरित्या काम करते. त्यामुळे अंध व्यक्तींच्या संबंधित ज्या काही अप्रिय घटना घडतात त्या घटना मोठ्या प्रमाणावर या चष्म्याचा वापर केल्याने रोखता येतील.
दरम्यान, आदितीच्या या प्रयोगामुळे तिचे सर्वांनी कौतुक केले आणि तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात या प्रयोगामुळे तिला प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले. अदितीला हा प्रयोग प्रदर्शित करण्यासाठी शारदा इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री. मिश्रा त्याचबरोबर विज्ञान चे शिक्षक जयसिंग काळे, ऋषिकेश ढगे, रविंद्र औटी यांचे तिला मार्गदर्शन लाभले. सदरील विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, शाळेचे मुख्याध्यापक धनराज सोनवणे तसेच कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केले होते.