क्राइम
मारहाण करून वृद्ध दाम्पत्याला लुटले, केज शहरातील घटना….!
केज दि.१२ – मागच्या काही दिवसांपासून चोरींच्या घटनांमध्ये घट झालेली होती. मात्र पुन्हा एकदा चोरट्यानी आपले डोके वर काढले असून शहरांमध्ये चोरीच्या घटना घडू लागलेल्या आहेत. शहरातील उमरी रोडवरील सहयोग नगर मध्येही रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका वृद्ध दांपत्याला मारहाण करून लुटण्याची घटना घडली आहे.
केज शहरातील उमरी रोडवरील सहयोग नगर मध्ये मोहन विश्वनाथ दांगट आणि त्यांच्या पत्नी हे दोघेच घरी असतात. आणि याचीच संधी साधून रात्री दोन ते तीन च्या सुमारास चौघां चोरट्यांनी घरामध्ये गेटची जाळी तोडून प्रवेश केला. आणि हातातील धारदार शस्त्रांचा धाक दाखवत घरातील सामानाची झाडाझडती घेऊन दोन मोबाईलसह पोबारा केला.सदरील घटनेमध्ये चौघांनी वृद्ध दांपत्याला मारहाण केल्याने सदरील दाम्पत्य अतिशय भयभीत झाले आहे. सदरील चोरट्यांनी वृद्ध दांपत्याला घरामध्ये कोंडून बाहेरून कड्या लावून घेऊन पोबारा केला. आणि एवढेच नव्हे तर त्यांच्या घरी जे दोन-तीन किरायदार राहतात त्यांच्याही दरवाजाला बाहेरून कड्या लावल्या. आणि सदरील घटना घडल्यानंतर वरच्या मजल्यावर राहत असलेल्या किराया दाराला त्या दांपत्याचा आरडा ओरड ऐकू आल्याने त्यांनी सहयोग नगर मधील इतरांना याची कल्पना दिली. आणि त्यानंतर सहयोग नगर मधील काही जणांनी दांगट यांच्या घराकडे धाव घेऊन त्यांची सुटका केली.
दरम्यान, पोलिसांनी सदरील घटनेचा पंचनामा केला असून पुढील कारवाई सुरू आहे.नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र सदरील घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून पोलिसांनी गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे.