#Accident
ट्रॅक्टर चालकाच्या सीटखाली खाली साप, ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू….!

केज दि.25 – ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक बसलेल्या सिटखाली साप निघाल्यामुळे चालकाचा ताबा सुटून ट्रॕक्टर पलटी झाले. त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धारूर शहरा पासून जवळच केज रोडवर घडली. बळीराम रघुनाथ नाईकवाडे वय २७ वर्षे रा . घागरवाडा असे मयत चालकाचे नाव आहे .
तालुक्यातील घागरवाडा येथील बळीराम नाईकवाडे हे स्वतःचा ऊस एम एच.१९ ए .आर. या ट्रॅक्टरने येडेश्वरी कारखान्यास नेत होते. परंतु सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धारूर शहरापासून हाकेच्या अंतरावर हजारी पेट्रोल पंपाजवळ चालक बसलेल्या सिट खालून साप बाहेर निघाला. साप दिसताच चालक गोंधळून गेल्यामुळे त्याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाला. चालकाच्या अंगावरच ट्रॅक्टर हेड पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. आणि यातच चालक बळीराम नाईकवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. साप मात्र त्याच ठिकाणी होता. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना साप दिसल्यानंतर त्यास मारण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून रोडवर पसरलेल्या उसामुळे वाहतुकीला अडथळा येत असल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठण्यात आले आहे.
