केज दि.२८ – खामगाव ते पंढरपूर राज्य रस्त्या दरम्यान कळंब शहराजवळील मांजरा नदीवरील पुलाचे काम मागच्या कित्येक वर्षांपासून रखडलेले आहे. सदरील पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे यासाठी कित्येकदा आंदोलने करण्यात आली आणि पुलाचे काम जर लवकर होत नसेल तर जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा किलोमीटर पर्यंत जो रस्ता खराब झालेला आहे तो तरी किमान दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र मेघा इन्फ्रास्ट्रक्चर कन्स्ट्रक्शन कंपनीने याची कसल्याच प्रकारची दखल न घेतल्याने आ. नमिता मुंदडा यांच्या पत्राची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या माध्यमातून आता मेघा कंपनीला निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. आणि दोन दिवसांमध्ये दोन्ही बाजूच्या रस्त्याची काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मेघा कंपनीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आ. नमिता अक्षय मुंदडा, केज विधानसभा सदस्या यांचे संदर्भीय पत्र क्र ३ या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. सदर पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, केज ते कुसळंब महामार्गावरील कळंब जवळील मांजरा नदीवरील नवीन पुलाचे काम पुर्ण झालेले आहे. परंतु अदयापपर्यंत आपण Approaches जोडण्याचे काम चालू केलेले नाही. याबाबत आपणास वारंवार सुचना दिलेल्या आहेत. परंतु आपण अदयापपर्यत काम चालू केलेले नाही. तसेच आपणास जोपर्यंत नवीन पुलाच्या Approaches चे काम चालू होत नाही तोपर्यंत जुन्या पुलाच्या Approaches दुरुस्ती करण्याबाबत आपणास कळविण्यात आले होते. परंतु जुन्या पुलाचे Approaches दुरुस्ती चे पण काम अद्यापपर्यंत चालू केलेले नाही. याबाबत आ. श्रीमती नमिता अक्षय मुंदडा यांच्याकडुन तसेच मिडीया यांच्या माध्यमातून वारंवार विचारणा होत आहे. यामुळे या कार्यालयाची / RO MORTH या कार्यालयाची प्रतिमा खराब होत आहे.
दरम्यान, कळंब जवळील जुन्या पुलाचे Approaches दुरुस्ती चे काम दोन दिवसात तात्काळ चालू करण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल फोटोसह या कार्यालयात सादर करण्यात यावा अशी सूचना कार्यकारी अभियंता, म.रा.र.वि.म.मर्या शिबीर कार्यालय, जालना यांनी मेघा कंपनीला दिली आहे.