सुस्त प्रशासनाला जाग येईल का…?
केज दि.२३ – ”गेंड्याची कातडी पांघरणे” या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय असू शकतो याचा प्रत्यय केज शहरामध्ये मध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून येत आहे. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्यानाही एक ना एक दिवस जाग येते. मात्र केज शहरात तसे होताना दिसत नाही.
सदरील मुद्दा हा केज शहरातील आहे. मुख्य रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून कळंबकडे जाणाऱ्या रोडवर काही अंतरावर पोल उभारण्यात आलेले आहेत. मात्र ते दिवे चालू करण्यासाठी एवढ्या महिन्यांचा विलंब का होतोय हे मात्र शहरवासीयांना पडलेले कोडे आहे. स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने मागच्या अनेक महिन्यांपासून कित्येकदा आंदोलने करण्यात आलेली आहेत. परंतु प्रत्येक वेळी पोकळ आश्वासनाशिवाय आंदोलन कर्त्यांनाकाहीच मिळालेली नाही. मग स्ट्रीट लाईट सुरु करण्यासाठी नेमकी काय अडचण आहे? हेही समोर येताना दिसत नाही. आणि यावर स्थानिक स्वराज्य संस्था आणि जे पदाधिकारी आहेत ते केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही या प्रश्नाचं काहीही सोयरसुतक नाही. बसवलेले स्ट्रीट लाईट ”असून अडचण नसून खोळंबा” असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दरम्यान, शहरातील या दोन मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. आणि रात्रीच्या वेळी अंधारामुळे मोठी अडचण निर्माण होते. तरीही स्ट्रीट लाईट सुरु होत नाहीत….! मग यामागे नेमके काय गौडबंगाल आहे हे तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगावे म्हणजे शहरवासीयांना एकदाची काय अडचण आहे ते तरी लक्षात येईल. मात्र याच मुद्द्यावर आता केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी निर्वाणीचा इशारा दिला असून स्ट्रीट लाईटचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.