
केज दि.६ – खामगाव-पंढरपुर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव कारखाना येथील माता वैष्णवी देवी मंदिरासमोर भरधाव अज्ञात वाहनाने दिंडीतील वारकऱ्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वारकरी जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.
सेलु तालुक्यातील लाडनांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानची आषाढी वारीसाठी प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दिंडी चालली होती. या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड हे आहेत. ही दिंडी दि.३ जुलै बुधवारी लाडनांद्रा येथुन निघाली. सदर दिंडी शुक्रवार दि.५ रोजी तेलगाव ता.धारुर कारखाना येथील माता वैष्णवीदेवी मंदिरात मुक्कामास होती. दिंडीतील वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडुन भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने वारकरी गायकवाड यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या ते जागीच ठार झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी महेश साळुंके, बालाजी सुरेवाड आदि घटनास्थळी दाखल आणि पुढील कारवाई सुरू केली आहे.
