ब्रेकिंग
केज विधानसभेच्या आखाड्यात आणखी एक निष्ठावंत कार्यकर्ता उतरण्याच्या तयारीत…..!
केज दि.१० – जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसतसे वेगवेगळे उमेदवार समोर येताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी होत आहे केज विधानसभा मतदारसंघात. मागच्या काही दिवसांपासून केज विधानसभेसाठी इच्छुक असणारे वेगवेगळे चेहरे समोर येत आहेत. आणि त्यामध्येच आणखी एका इच्छुक उमेदवाराची भर पडली असून तेही विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत.
केज विधानसभा मतदारसंघाची अतिशय संवेदनशील आणि मागासलेला मतदार संघ म्हणून अशी दुहेरी ओळख आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे मात्र प्रत्येक वेळेस उमेदवार जरी अनुसूचित जातीतील असला तरी कारभार पाहणारे हे वेगळेच असतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यावेळेस कधी नव्हे एवढी इच्छुकांची यादी लांबत चाललेली आहे. आणि यामध्ये केजचे स्थानिक रहिवासी असलेले शेषेराव कसबे यांचीही भर पडली आहे. शेषराव कसबे हे मागच्या पंचवीस वर्षांपासून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याशी आणि मुंडे कुटुंबीयांशी एकनिष्ठ असलेले भाजप कार्यकर्ते आहेत. मागच्या काही वर्षांपूर्वी ते स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वीकृत सदस्य म्हणून ही राहिलेले आहेत. तसेच त्यांच्या पत्नीही ग्रामपंचायतच्या उपसरपंच म्हणून काही काळ होत्या. अनेक कार्यकर्त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये वेगवेगळे पक्ष बदलले मात्र शेषेराव कसबे हे भाजप आणि मुंडे कुटुंबीयांशी एकनिष्ठ आहेत.तर सध्या ते भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे तालुकाध्यक्ष असून त्यांचे मोठ्या प्रमाणावर त्या आघाडीमध्ये कामही आहे. दलित, वंचित घटकांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कसबे हे सक्रिय असतात. मोठ्या प्रमाणावर त्यांचा संपर्क असून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे जे मूळ सहकारी आणि कार्यकर्ते होते त्यांचा आजही पाठिंबा कसबे यांना आहे. त्यामुळे कसबे यांनी केज विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले भाग्य आजमावण्याचे ठरवले असून पक्षश्रेष्ठीकडे तिकीट मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, केज विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणात आणखी एका निष्ठावंत इच्छुक उमेदवाराची भर पडल्याने पक्ष कुणाला संधी देतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.