जोमात आलेल्या सोयाबीनला रोगाची दृष्ट….!
केज दि. १२ – तालुक्यातील माळेगाव शिवारात अनुकूल वातावरण व संततधार पावसाने सातत्याने हजेरी लावल्याने सोयाबीनची अपेक्षित वाढ होऊन जोमात आले. सध्या सोयाबीन फुल व शेंगा धारणेच्या अवस्थेत आहे. मात्र मागील आठ-दहा दिवसात सतत ढगाळ वातावरण राहिल्यामुळे जोमात व बहरात असलेल्या सोयाबीनला विविध प्रकारच्या कीड रोगाची दृष्ट लागली आहे.तसेच काही ठिकाणी पिवळा व हिरवा मोझॅक आढळून आल्याचे
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे घेऊन धाडस करून फवारणी करावी लागत आहे.
यंदा शेतकऱ्यांना मान्सूनची जास्त प्रतीक्षा करावी लागली नाही.वेळेत आणि पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी यंदा मृग नक्षत्रात पेरणी उरकून घेतली. परिसरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोयाबीनचाच सर्वाधिक पेरा झाला. त्यानंतर पावसाने अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपात हजेरी लावल्याने पिके चांगलीच बहरत जोमाने वाढत होती. मात्र अशात सतत ढगाळ वातावरण राहिल्याने सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळी, उंटाळी खोडमाशी चक्रीभंगा तंबाखू वरील पाणी खाणारे अळी लष्करी आळी हिरवा व पिवळा मोझॅक इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या दिसून येत आहे. किडीने सोयाबीनचे पाने व शेंगा खाऊन उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी जास्त वाढलेल्या सोयाबीनमध्ये शिरून धाडस करून फवारणीसाठी धावपळ करत आहे.
अशी करा उपायोजना व फवारणी
सोयाबीनचे पिवळा व हिरवा मोझॅक विषाणूग्रस्त झाड शेतातून उपटून नष्ट करावेत. जमिनीमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराला चर तयार करावेत, सोयाबीन सध्या फुले लागलेल्या व फुलांचे रूपांतर शेंगांमध्ये होत असलेल्या सोयाबीनच्या शेंगा व्यवस्थित भरण्यासाठी मोनो पोटॅशियम फॉस्फेट (००:५२:३४) हे विद्राव्य खत ८ ग्रॅम अधिक महाराष्ट्र ग्रेड दोन सूक्ष्म अन्नद्रव्य दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यातून फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये अळीवर्गीय किडींचा व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल ९.३% अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ४.६% झेडसी पूर्वमिश्रित कीटकनाशक ८० मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल १८.५ एससी ६० मिली किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८% एससी १०० मिली किंवा आयसोसायक्लोसिरम ९.२% डीसी १२० मिली किंवा फ़्ल्युबेन्डामाईड २०% डब्ल्युजी १०० ग्रॅम किंवा फ़्ल्युबेन्डामाईड ३९.३५% एससी ६० मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर क्षेत्रासाठी फवारणी करावी. बुरशीजन्य रोग शेंग पापडी, शेंग करपा प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी पायराक्लोस्ट्रोबिन २० डब्ल्यू जी १ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १०% अधिक सल्फर ६५% संयुक्त बुरशीनाशक दिड ग्रॅम किंवा फ्लुक्सापायरोक्साड अधिक पायराक्लोस्ट्रॉबिन एससी पूर्वमिश्रित संयुक्त बुरशीनाशक १ मिली प्रती १ लिटर पाण्यातून फवारणी करावी असा सल्ला कीड रोग व्यवस्थापन तज्ज्ञ शिवप्रसाद येळकर यांनी दिला आहे.