#Social
केज शहरातील वैद्यकीय सेवा बारा तास ठप्प…..!
केज दि. १७ – कोलकाता येथे अमानवीय पद्धतीने एका महिला डॉक्टर वर अत्याचार करून हत्या करण्यात आली. संपूर्ण देशामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. आणि याचाच एक भाग म्हणून केज मध्येही सर्व डॉक्टर्स ने एकत्र येत एक दिवसाचा संप पुकारत तिव्र शब्दात निषेध नोंदवला आणि पीडितेच्या कुटुंबीयास न्याय मिळावा व डॉक्टर्स वर होणाऱ्या हल्ल्यांवर काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी केजचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
कोलकाता येथे अमानवी अत्याचार करून एका महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली. सदरील घटना ही अत्यंत क्रूरतेचा कळस असून मानवी समाजाला काळीमा फासणारी आहे. सदरील घटना घडल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने ठीकठिकाणी निदर्शने, संप आणि बंद पुकारण्यात आला. मागच्या काही दिवसांपासून जीवदान देणाऱ्या डॉक्टरचे जीवन धोक्यात आले की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स वर शुल्लक कारणावरून हल्ला करणे, दवाखान्याची तोडफोड करणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागलेले आहेत. आणि त्याच अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशन केज, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक संघटनेच्या वतीने येथील विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. आणि त्यामध्ये दिनांक 17 रोजी सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्याचे ठरवण्यात आले. तसेच डॉक्टरच्या सुरक्षेचा जो प्रश्न ऐरणीवर आलेला आहे त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनाने पावले उचलावीत अशी आग्रही भूमिका तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मांडली. त्याचबरोबर कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी आयएमए चे तालुकाध्यक्ष डॉ. दिनकर राऊत, सचिव डॉ. भाऊसाहेब चाळक, खाजगी डॉक्टर्स संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. वसुदेव नेहरकर, सचिव डॉ. उमाकांत मुंडे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील डॉक्टर्स मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दरम्यान डॉक्टर्सने एक दिवसाचा संप पुकारल्याने काय परेशानी होऊ शकते हे तालुक्यातील बहुतांश रुग्णांनी अनुभवले. त्यामुळे जीवदान देणाऱ्या डॉक्टर्सना योग्य संरक्षण मिळावे अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.