राजकीय
जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकीत खा.रजनीताई पाटील काँग्रेसच्या स्टार प्रचारक……!
बीड दि.३ – जम्मू-काश्मीरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी काँग्रेसनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कॉग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्रातून एकमेव खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांचा समावेश आहे. काँग्रेसने रजनीताई पाटील यांची स्टार प्रचार म्हण्ून निवड केल्याने पाटील यांची गांधी घराण्याशी असलेली एकनिष्ठता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर कॉग्रेसने आता आगामी होऊ घातलेल्या महाराष्ट्र आिण जम्मू काश्मिर निवडणुकांमध्ये लक्ष घातले आहे. सत्ताधारी भाजपविरुध्द काँग्रेसने आता कंबर कसली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये प्रथमच विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं 40 दिग्गज नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून जम्मू काश्मीरमध्ये प्रचाराकरिता उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. स्टार प्रचारकांमध्ये काँग्रेसने पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिलेल्या खासदार रजनीताई पाटील यांचा समावेश आहे. स्टार प्रचाराकंच्या यादीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, जयराम रमेश, अंबिका सोनी, अजय माकन, सलमान खुर्शीद, कन्हैया कुमार आणि महाराष्ट्रातील रजनी पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचाही स्टार प्रचारकाच्या यादीत समावेश आहे.