महाराष्ट्र
माजी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना ‘लाईफ टाईम अॅचिव्हमेंट अवॉर्ड’…!
छत्रपती संभाजीनगर,दि.२१ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.प्रमोद गोविंदराव येवले यांना औषधनिर्माणशास्त्र, शिक्षण क्षेत्रातील साडे चार दशकांच्या योगदानाबद्दल ‘लाईफ टाईम अॅचिव्हमेंट अॅवार्ड’ घोषित करण्यात आला आहे. ’ असोसिएशन ऑफ फार्मसी टिचर्स ऑफ इंडिया’ (एपीटीआय) यांच्या वतीने सदर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
या राष्ट्रीय संस्थेच्यावतीने २०२४ या शैक्षणिक वर्षातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भोजराज पंचामूल अॅवार्ड या नावाने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार डॉ.प्रमोद येवले यांना घोषित करण्यात आला. डॉ.येवले हे २०१९-२०२३ या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरुदी कार्यरत होते. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात प्रकुलगुरु, अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य आदी पदांवर कार्य केले आहे. तसेच ‘फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडिया’चे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. डॉ.येवले हे सध्या राज्य गुणवत्ता हमी कक्षाचे अध्यक्ष असून कार्यरत आहेत. तसेच ’एआयसीटीई’चे कार्यकारिणी सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. आदर्श शिक्षक, प्राचार्य, कुलगुरु आदी एकुण १६ पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. येत्या २७ सप्टेंबर रोजी ओरिसातील भुवनेश्वर मध्ये ’पीटीआय’च्या वार्षिक अधिवेशनात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.