आरोग्य व शिक्षण
केजकरांनो… एक्सपायरी डेट बघूनच पॅकिंगमधील अन्न पदार्थ विकत घ्या….!
डी डी बनसोडे
October 13, 2024
केज दि.१३ – धावपळीच्या आणि घाईगडबडीच्या जीवनामध्ये अनेक जण दुकानात मिळणारे पदार्थ घेऊन येतात आणि वेळेला तेच पदार्थ खातात. परंतु दुकानांमध्ये घेतल्या गेलेले पदार्थ जर आरोग्यासाठी हानिकारक असतील आणि कालबाह्य झालेले पॅकिंगचे अन्नपदार्थ जर विकल्या जात असतील तर आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. आणि असाच काहीसा प्रकार केज शहरातील काही अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानांमध्ये आणि बेकरीमध्ये पाहायला मिळत आहे. बाजारामध्ये सध्या अगदी प्रमाणीत करण्यात आलेले गोंडस अशा पॅकिंग मध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवल्या जातात.काही अडचणीमुळे किंवा धावपळीमुळे अनेकांना तेच पदार्थ विकत घेऊन खावे लागतात. काही अतिशय नावाजलेल्या कंपन्या आहेत आणि त्याच्यावर ग्राहक डोळे झाकून विश्वास ठेवत आलेले आहेत.त्यामुळे ते अन्नपदार्थ घरी आणून अगदी विश्वासाने खातात. मात्र सध्या केज मध्ये काही दुकानांमध्ये आणि बेकरीमध्ये कालबाह्य झालेले अन्नपदार्थ विकल्या जात आहेत. पॅकिंगवर लिहिलेली एक्सपायरी डेट ही स्पष्टपणे दिसतही नाही. मात्र विश्वासाने ते पॅकिंग आपण विकत घेतो आणि भूक भागवतो. मागच्या दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील अतिशय नावाजलेल्या एका कंपनीचे बन पावचे पॅकिंग घेतले. मात्र ते उघडल्यानंतर चक्क त्यामध्ये बुरशी आलेले बन पाव आढळून आले. अतिशय विश्वास असलेली ही कंपनी आपले अन्नपदार्थ बनवताना काळजी जरी घेत असली तरी पुरवठा करणारे एजन्सी धारक आणि विक्री करणारे दुकानदार आणि बेकरीवाले माल दुकानांमध्ये आणून ठेवतात आणि तारीख निघून गेलेली असली तरी ग्राहकांना सर्रासपणे ते विकत आहेत. त्यामुळे असे डोळे झाकून आणि विश्वासाने जर आपण पदार्थ घेत असाल तर नक्कीच यापुढे विचार करण्याची गरज असून अगदी खात्री करूनच पदार्थ घेणे गरजेचे झालेले आहे. आणि केज तालुक्यासाठी जे अन्न व भेसळ निरीक्षक आहेत त्यांनीही योग्य ती कारवाई केली पाहिजे.
दरम्यान सदरील प्रकाराबद्दल केज शहरातील संबंधित बेकरी वाल्याला विचारले असता त्यांनी एजन्सी वाल्याकडे बोट दाखवले तर एजन्सी वाल्यांना विचारले असता त्यांनी विकणारा चा दोष असल्याचे सांगितले. हे एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार ग्राहकांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे यावरून दिसून येते. सदरील पदार्थ बनवणाऱ्या कंपनीला यासंबंधी मेल करून सर्व माहिती दिल्या गेली आहे. आता त्यांचे काय उत्तर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र अशा प्रकारचे पॅकिंगचे अन्नपदार्थ घेताना आपणच आता काळजी घेतली पाहिजे हे मात्र नक्की…..!