महाराष्ट्र
आज वाजणार बिगुल, विधानसभा निवडणुकीची घोषणा कांही तासांमध्ये…..!
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे लक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. अखेर आज (15 ऑक्टोबर) दुपारी 3.30 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती
समोर आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत कधीपर्यंत ?
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर याकालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यतावर्तवली जात आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान
झाले होते. पण यंदा हरियाणा
विधानसभेची निवडणुकांची घोषणा आधी झाली.
कोणत्या राज्यात किती जागा?
महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे. झारखंड विधानसभेत 81 सदस्य आहेत. या राज्यात 2019 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. हरियाणामध्ये 90 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले. जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे राज्य विभागले गेले आहे. याआधी 2014 मध्ये येथे शेवटची निवडणूक झाली होती.