
केज दि.१९ – मागच्या अनेक दिवसांपासून केज विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे तिकीट कोणाला मिळणार आणि महायुती पुन्हा आपली जागा सुरक्षित ठेवणार का ? या चर्चेला उधाण आलेले आहे. मात्र यामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून राखीव असलेल्या विधानसभा मतदारसंघाला नेमके काय मिळाले ? हे मात्र अद्यापही दिसून येत नाही. त्यामुळे विद्यमान आमदार जरी विकास केल्याचा डंका पिटत असतील आणि इच्छुक उमेदवार आम्ही निवडून आल्यानंतर चंद्र तारे तोडून आणू अशा वल्गना करत असतील तरीही केज विधानसभा मतदारसंघ हा मागच्या कित्येक वर्षांपासून आहे त्याच परिस्थितीमध्ये आहे. केज विधानसभा मतदारसंघावर मागच्या कित्येक वर्षांपासून मुंदडा कुटुंबीयातील सदस्यांची सत्ता आहे. स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्यानंतर पोट निवडणूक वगळता त्याच कुटुंबाकडे सत्ता आहे, मग तो पक्ष कोणताही असो. केज विधानसभा मतदारसंघांमध्ये केज, आंबेजोगाई हे दोन तालुके आणि नेकनूर शहरासारखा एक मोठा भाग समाविष्ट झालेला आहे. परंतु या मतदारसंघांमध्ये अद्यापही कुठलेच असे शाश्वत काम झालेले नाही. बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा प्रकल्प सत्ताधारी आमदार नमिता मुंदडा यांच्याकडून कार्यान्वित झालेला दिसत नाही. पूर्ण पाच वर्ष मतदार संघातील नागरिकांना केवळ आश्वासने द्यायची असाच काहीसा प्रकार दिसून येत आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये अद्यापही एमआयडीसी कार्यान्वित झालेली नाही. केज शहरातील फलोत्पादन च्या जागेचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या गावकऱ्यांना आपला भाजीपाला विकायला बसण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध करून देता आलेली नाही.केज शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना साधे खेळाचे मैदान असो किंवा एखादा बगीचा सुद्धा उभारता आलेला नाही. ग्रामीण भागातील काही तुरळक रस्ते वगळता आजही खड्ड्यांतून आणि गुडघाभर चिखलातून नागरिकांना चालावे लागत आहे. केज शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवून छोट्या व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देण्यामध्ये सत्ताधारी आमदार नमिता मुंदडा यांनी काय प्रयत्न केले ? शहर म्हणून आणि आपण त्याचे काही देणे लागतो हा विचार करून अद्यापही नळ योजना नवीन तर सोडाच परंतु आहे ती सुद्धा दुरुस्त करता आलेली नाही. केज शहरातील जो विस्तारित भाग आहे त्या भागात अद्यापही नळ योजना पोहोचलेली नाही. अंतर्गत रस्ते हे अपवाद वगळता जैसे थे आहेत. त्यामुळे एवढे सारे प्रश्न प्रलंबित असताना नेमका विकास कोणता केला ? हे मात्र समजायला मार्ग नाही. आणि आम्ही मतदारसंघाचा किती विकास केला याचा डांगोरा मात्र पिटल्या जात आहे.