#Election
मा. आ. संगिता ठोंबरे यांचा झंझावात सुरू….!
केज दि.३१ – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचार दौऱ्याला कमालीचा वेग आलेला आहे. मागच्या दोन महिन्यांपासून इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पक्षाकडे जाऊन तिकिटाची मागणी करत होते.मात्र आता त्यावर पडदा पडला असून उमेदवारी दाखल झाली आहे. केज विधानसभा मतदारसंघांमध्येही अनेक उमेदवार आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत आणि आपापल्या परीने प्रचार करताना दिसत आहेत. परंतु या सर्वांमध्ये एक आश्वासक चेहरा सध्या आकर्षणाचा विषय झालेला असून कित्येक ठिकाणी या उच्च शिक्षित माजी आमदाराचे जोरदार स्वागत होत आहे.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये बरेच इच्छुक उमेदवार मागच्या तीन चार महिन्यांपासून कामाला लागलेले आहेत. आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण सर्वांना परिचित व्हावे यासाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत गावोगाव फिरताना दिसत आहेत. मात्र सर्वपरिचित प्रा.संगिता ठोंबरे नावाचा एक आमदारकीचा अनुभव असलेला चेहरा सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आणि वंचित घटकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत असून मतदारसंघातील बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी काम मिळावे, महिलांना सन्मान मिळावा यासाठी काम करण्याचा मनोदय व्यक्त करत आहे. प्रचार दौऱ्यादरम्यान महिला आणि तरुणांची जी सध्याची परिस्थिती आहे त्या प्रश्नाला हात घालत असून जे कधी पूर्णच होणार नाहीत असे आश्वासन न देता जे पूर्ण होतील अशी आश्वासने देत असल्याने संगिता ठोंबरे यांच्यावर विश्वास दृढ झालेला आहे आणि म्हणूनच मतदार त्यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून पाहू लागले आहेत.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये बेरोजगारी मिटवण्यासाठी शाश्वत अशा एकाही प्रकल्पाची उभारणी झालेली नाही. काही अपवाद वगळता मतदार संघातील हजारो उच्चशिक्षित तरुण आज रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. आणि म्हणूनच प्रा.ठोंबरे या प्रश्नावर फोकस करत असून या तरुणांच्या हाताला जर काम मिळाले तर इतर काही गोष्टी मोठ्या प्रमाणावर करण्याची गरजच भासणार नाही असा विश्वास तरुणांना दाखवत आहेत. त्यामुळे प्रा.ठोंबरे आपल्या समस्येविषयी बोलताना दिसतायत, तळमळ आहे असे वाटू लागल्याने गावागावातील बेरोजगार तरुण आणि महिला ठोंबरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
प्रा. ठोंबरे जसे बेरोजगारीवर बोलतात त्याचप्रमाणे स्वतः अनुभवी असल्याने मतदारसंघात विविध योजना कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात आहेत. संधी मिळाली तर मतदारसंघातील प्रत्येक गावातील वीज, पाणी आणि रस्ते यासारख्या मूलभूत गरजा मार्गी लावणार असल्याचा शब्द देत आहेत. मतदार संघातील वेगवेगळ्या गावांमध्ये ठोंबरे गेल्यानंतर अशाच प्रकारचा परिस्थितीची जाण असलेला मतदार संघाला प्रतिनिधी पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे प्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ सत्ता पाहिजे किंवा पैसाच पाहिजे असे काही नसून मतदारांनी जर ठरवले तर अगदी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही ते पदावर नेऊन बसऊ शकतात याचे अनेक उदाहरणे मागच्या काही निवडणुकांमध्ये दिसून आलेले आहे.
दरम्यान प्रा.ठोंबरे यांच्याकडे एक विशिष्ट व्हिजन असल्याने अवघ्या काही दिवसांमध्येच त्या मतदार संघामध्ये आणि विशेषता सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्यामुळे त्या अपक्ष उमेदवार म्हणून जरी निवडणूक लढत असल्या तरी सर्वच स्तरातून प्रतिसाद मिळत असल्याने प्रस्थापितांना त्या धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.