महाराष्ट्र
मनोज जरांगे पाटील यांनी घेतले महत्वाचे निर्णय…..!
बीड दि.३१ – आज पुन्हा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकी संदर्भात नेमकं काय ठरवायचं ? यासाठी आंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. आणि यामध्ये आता कोणत्या जागा लढवायच्या ह्यासाठी तीन तारखेला जागा आणि उमेदवार जाहीर करणार असे स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे बैठक घेतली. यावेळी आनंदराज आंबेडकर आणि मुस्लिम धर्मगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये कोणत्या जागा लढवायच्या ? तसेच कोणते उमेदवारी अर्ज परत घ्यायचे उमेदवार कोण असणार ? हे आम्ही ठरवणार असे स्पष्ट केले. आमची सहन करण्याची क्षमता आता संपली असून परिवर्तन नक्कीच होणार. आणि आम्ही आता आम्हाला संपवायला निघालेल्यांचा सुपडा साफ करणार असाही इशारा दिला. समाजाला राजकारणाच्या गुंडगिरीतून बाहेर काढलं असे सांगत सर्वच समाजाला सोबत घेत निवडणुकीमध्ये सर्वांचं सहकार्य घेणार असे सांगितले. मुस्लिम, मराठा, दलित एकत्र येण्यावर या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि हे सर्व एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही असेही बोलून दाखवले. आता गरिबांची लाट असून माघार घ्यायची नाही. कोणत्याच सरकारने शेतीमालाला भाव दिला नाही. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीमध्ये दादागिरी आणि गुंडगिरी चालू द्यायची नाही असेही स्पष्ट केले. मराठ्यांनी यापुढे आझाद म्हणून जगावं गुलामगिरीमध्ये जगायचं नाही. लाईट, पाणी यावरच निवडणूका होत आहेत. दलित, धनगर, मुस्लिम आणि मराठा समाजाला आतापर्यंत सरकारने काय दिलं ? असा सवाल ही उपस्थित केला.
दरम्यान आता मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा कोणत्या उमेदवारांना राहणार ? कोणते उमेदवार त्यांच्या पाठिंबावर बाजी मारणार ? हे तीन तारखेला ठरणार असल्याने जरांगे पाटील यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा म्हणून कित्येक इच्छुक उमेदवार आंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटलांची भेट घेत आहेत.