#Election
आ. मुंदडांच्या प्रचाराला दिवसेंदिवस येतोय वेग….!

केज दि.२ – विधानसभा निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी आणखी दोन दिवस शिल्लक आहेत. यादरम्यान अनेक घडामोडी घडू लागलेल्या आहेत मात्र जे पक्षीय उमेदवार आहेत आणि ज्यांना निवडून येण्याचा आत्मविश्वास आहे अशा उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. आणि यापैकीच एक असलेल्या महायुतीच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू झाला आहे.
केज विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 47 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र त्यापैकी चार उमेदवारी अर्ज बाद झाल्याने 43 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. तर चार तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार असल्याने चार तारखेला किती जण निवडणुकीतून माघार घेतात आणि मैदानात किती उरतात ? यावर केज विधानसभेची निवडणूक कशी होणार हे चित्र स्पष्ट होईल. मात्र विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी कोण मैदानात राहणार ? कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार? याचा फारसा विचार न करता आपल्या प्रचाराची रणनीती आखरी आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून अपवाद वगळता मुंदडा कुटुंबीयांकडेच केज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व असल्याने विधानसभा मतदारसंघातील गावागावात त्यांचे कार्यकर्ते आहेत. प्रत्येक गावात काहीना काही काम केल्याने विकासाच्या दृष्टीनेही बहुतांश मतदार त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील जे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत ते अगदी कंबर कसून प्रचाराला लागले असून आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या कामांचा पुनरुच्चार करत मतदारांना नमिता मुंदडा यांच्या बद्दल माहिती देत आहेत. यामध्ये केज, आंबेजोगाई आणि नेकनूर परिसरातील प्रमुख कार्यकर्ते नमिता मुंदडा यांना पुन्हा आमदार म्हणून पाहण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत. नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी मतदारसंघांमध्ये तगडी फौज उभी राहिली असून यामध्ये विशेषता महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे. रस्त्याचा, पाण्याचा देवस्थानांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार मुंदडा यांनी अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणचे मूलभूत प्रश्न सुटलेले आहेत.
दरम्यान आमदार मुंदडा यांनी जरी मोठ्या प्रमाणावर निधी मतदार संघासाठी आणलेला असला तरी मतदारसंघातील अनेक भागांमध्ये काही प्रश्न प्रलंबित आहेत. आणि हे राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी आणि आमदार मुंदडा यांना पुन्हा विधिमंडळामध्ये पाठवण्यासाठी कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले असल्याचे चित्र सध्या केज विधानसभा मतदारसंघांमध्ये दिसत आहे. आणि एवढेच नव्हे तर नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा आणि स्वतः आमदार नमिता मुंदडा यांनीही मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे.