आ. नमिता मुंदडा यांचा प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर….!

केज दि.३ – विधानसभा मतदारसंघांमध्ये दिवसेंदिवस प्रचाराची रणधुमाळी वाढत आहे. यामध्ये काही प्रमुख उमेदवार प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी केज शहरातील व्यापाऱ्यांची प्रत्यक्ष दुकानात जाऊन भेट घेतली आणि एवढेच नव्हे तर आठवडी बाजारामध्ये जाऊनही ग्रामीण भागातून आलेल्या भाजीपाला विक्रेत्यांची भेट घेतली. यावेळी अनेक ग्रामीण भागातील महिलांनी नमिता मुंदडा यांचे कौतुक करताना स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी मागच्या दोन दिवसांपासून केज शहरातील मंगळवार पेठ, भवानी चौक आणि इतर भागातील व्यापाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केलेल्या आहेत. यावेळी त्या प्रत्यक्ष व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन मतदान करण्याची विनंती करत आहेत. आणि आपल्या विकासाचे मॉडेल समोर ठेवत आहेत. यादरम्यान त्यांनी आठवडी बाजारामध्ये ही भेट दिली. यावेळी कित्येक महिलांनी स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या आठवणींना उजाळा देत नमिताताई ही तशाच प्रकारे आपुलकीने आणि प्रेमाने मतदार संघातील मतदारांची विचारपूस करतात अशा भावनाही व्यक्त केल्या.