बीड जिल्ह्यातील धारूर शहरापासून अवघ्या पंधरा किमी अंतरावर डोंगरावर विसावलेले गावंदरा नावाचे एक छोटे गाव. गावातील भगवान बडे (सावकार) नावाचे शेतकऱ्याने नदीच्या कडेला असलेल्या आपल्या शेतातील बांधावर 2000 साली सुमारे 40 गावरान आंब्यांची झाडे लावली. गावरान वाण असल्याने फळ तसे उशिराच सुरू झाले. उन्हाळ्यात आंब्याच्या सिझन मध्ये सर्वच झाडांना फळे लागू लागली. मात्र मागच्या वर्षीपासून 40 झाडांपैकी एक झाड असे निघाले की ते उन्हाळ्यातही आणि ऑगस्ट मध्येही बहरू लागले. उन्हाळ्यात आंबे देऊन हे झाड ऑगस्टमध्ये आंब्याने लकडून गेले होते आणि 9 क्विंटल आंबे उतरले. सहसा या दिवसात साधारणतः कुठेच आंबे नसल्याने मागणीही वाढली. 100 रुपये किलो भावा प्रमाणे एकाच झाडाचे 90000 रुपये उत्पन्न निघाले असून उन्हाळ्यातील उत्पन्न धरून एक झाड लाख मोलाचे ठरले आहे.
सदरील झाडांना कसल्याच प्रकारचा खर्च नसून मागणीप्रमाणे बीड आणि धारूर येथे आंब्याची विक्री केल्याची माहिती हनुमान भगवान बडे यांनी दिली.