कमळ जोमात, रेल्वे इंजिनचाही आवाज….तुतारी फुंकणाऱ्या माणसाचे काय…?
केज दि.७ – निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तसा प्रचार वेग घेत आहे. केज विधानसभा मतदारसंघांमध्येही मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा धुमधडाका सुरू झालेला असून यामध्ये कमळ जोमाने फुलत आहे, रेल्वे इंजिनही ग्रामीण भागात आवाज करत करत आहे मात्र तूतारी फुंकणारा माणूस अद्यापही दिसायला तयार नाही. केज विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि मनसेचे रमेश गालफाडे हे प्रमुख उमेदवार आहेत. विद्यमान आमदार नमिता मुंदडा ह्या आपल्या मागच्या कार्यकाळामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर गावागावात जाऊन मतदारांना विकास कामांची आठवण करून देत आहेत. नमिता मुंदडा यांच्या प्रचार मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्तेही दिसून येत आहेत. त्यामुळे कमळ जोमाने फुलताना दिसत आहे. तर पहिल्यांदाच मनसेकडून केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवल्या जात आहे आणि यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि मतदारसंघाला परिचित असलेले रमेश गालफाडे यांना उमेदवारी दिल्याने रेल्वे इंजिनचाही सध्या बोलबाला सुरू आहे. मात्र राशपकडून निवडणूक लढवत असलेले पृथ्वीराज साठे यांची प्रचार यंत्रणा कुठेतरी मागे पडली की काय असे दिसून येत आहे. मागच्या काही महिन्यांपासून प्रत्येक पक्षाचे इच्छुक उमेदवार गावागावात जाण्याचा प्रयत्न करत होते आणि आताही महायुतीचे, मनसेचे आणि काही अपक्ष उमेदवार सुद्धा झंझावती दौरे करत आहेत. मात्र त्या तुलनेत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन लढत असलेले पृथ्वीराज साठे हे कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यास कुठेतरी मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या तरी कमळाची आणि रेल्वे इंजिनचीच हवा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे. दरम्यान केज विधानसभा मतदारसंघाची लढत ही कमळ, तुतारी फुंकणारा माणूस आणि रेल्वे इंजिन मध्ये जरी होणार असली तरी यामध्ये सध्या नमिता मुंदडा यांनीच प्रचारामध्ये बाजी मारल्याचे दिसून येत आहे. तर तुतारी फुंकणाऱ्या माणसाला प्रोत्साहन देणारे बहुतांश नेते जिल्ह्यातील तिकीट वाटपाच्या वेळेपासून नाराज असल्याचे दिसत आहेत.