मा. आ. संगिता ठोंबरेंचे समर्थक नमिता मुंदडाच्या प्रचारात सक्रीय… !
केज दि.१० – माजी आमदार संगिता ठोंबरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या व निवडणुकीत माघार घेतल्याने नाराज झालेल्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या उपस्थितीत रविवारी दि. १० रोजी होळ येथे पार पडलेल्या बैठकीत केज विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमदार नमिता मुंदडा यांना पाठींबा दिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामध्ये माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी भाजपाकडून विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळणार असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला. परंतू राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निष्ठावंत असलेल्या पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संगिता ठोंबरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतू उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी त्यांनी नाट्यमय रित्या उमेदवारी अर्ज मागे घेत पृथ्वीराज साठे यांना पाठींबा दिला. त्यामुळे त्यांची चोवीस तासाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली. हा निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी अखेर रविवारी विजय केंद्रे यांच्या शेतात नंदकिशोर मुंदडा यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना पाठींबा जाहीर केला आहे. यावेळी माजी उपसभापती नेताजी शिंदे, महादेव सुर्यवंशी, सुनील घोळवे, विजय केंद्रे, सुधाकर लांब, माऊली इंगळे, विकास करपे, साहेबराव नवगिरे, अरूण करपे, दिपक भाकरे, दत्ता लाड, रणजित तपसे, कृष्णा करपे, अंकुश शिंदे, कैलास सोनवणे, दत्ता शेप, सचिन तोडकर, बिभीषण शिंदे, शिवरूद्र आकुसकर, धनंजय देशमुख, नितिन बनसोडे, माऊली शिंदे, बबनराव धस, उत्तम धस, संदीप गायकवाड यांच्या बहुतांश संगिता ठोंबरे यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.