केज दि.११ – दिवसेंदिवस निवडणुकीचा रंग वाढत चालला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू झाला आहे. वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांनी मतदारसंघ ढवळून निघत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून केज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या प्रचाराचाही धुराळा बुधवारी उडणार असून मुंदडांच्या बालेकिल्ल्याला आणखीनच मजबुती मिळणार आहे.
विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी सध्या मतदारसंघांमध्ये प्रचारात मुसंडी मारली आहे. हजारो कार्यकर्ते तसेच भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, स्वतः नमिता मुंदडा मतदारसंघ ढवळून काढत आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांपुढे मांडत आहेत. मात्र या सर्वांना जोड मिळावी म्हणून नेत्यांचे शब्दही महत्त्वाचे असतात. आणि त्यासाठीच देशाचे रस्ते विकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन मुंदडा यांच्या प्रचारार्थ करण्यात आले आहे. दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वा. श्री.शंकर महाराज विद्यार्थी वसतिगृह, अंबाजोगाई येथे होत असलेल्या नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेत माजी मंत्री पंकजा मुंडे, मा. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून केज विधानसभा मतदारसंघ हा पंकजा मुंडे यांना मानणारा मतदारसंघ आहे. आणि आताही पंकजा मुंडे यांनी मतदार संघातील सर्व कार्यकर्त्यांना अंग झाडून कामाला लागण्याची आदेश दिले आहेत.
दरम्यान, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेमध्ये स्वतः गडकरी, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, नमिता मुंदडा हे काय बोलणार ? कुणावर तोफ डागणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.