राजकीय
राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही – जयंत पाटील…!
केज दि.११ – केज विधानसभा मतदारसंघाचा आखाडा आता दिवसेंदिवस तापत चालला आहे. राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील नेत्यांच्या सभांचा धडाका मतदारसंघामध्ये सुरू आहे. आणि याचाच एक भाग म्हणून राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा राशपचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ पार पडली.
शहरातील धारूर रोडवरील खरेदी विक्री संघाच्या मैदानावर जयंत पाटील यांच्या सभेचे आयोजन दि.११ रोजी करण्यात आले होते. यावेळी जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. ते पुढे बोलताना म्हणाले की, महायुती सरकारने कायदा सुव्यवस्था तसेच राज्याच्या संस्कृतीचे धिंडवडे उडवले आहेत. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला आहे. आणि राज्यामध्ये येऊ घातलेले मोठमोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महिलांना लाडकी बहीण म्हणून दीड हजार देऊ केले आहेत परंतु महाविकास आघाडीचे सरकार आले तर आम्ही ३००० रुपये देऊ हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे असेही ते म्हणाले. पृथ्वीराज साठे हे निवडून आलेच आहेत, मात्र असाच पाठिंबा २० तारखेपर्यंत मतदारांनी साठे यांना द्यावा असे आवाहनही केले.
यावेळी व्यासपीठावर खासदार बजरंग सोनवणे, केज शहरातील ज्येष्ठ नेते राजेसाहेब (पापा) देशमुख, उमेदवार पृथ्वीराज साठे, मा.आ. उषाताई दराडे, मा. आ. संगीता ठोंबरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, डॉ.नरेंद्र काळे, रत्नाकर शिंदे, डॉ. अंजली घाडगे, सुरेश पाटील, हेमा पिंपळे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.