केज विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील आंबळाचा बरड म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंगर पट्ट्यातील प्रमुख ठिकाणी पंकजा मुंडे यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ही जागा माझ्या प्रतिष्ठेची जागा असून केज विधानसभेचा उमेदवार निवडून येणे हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. केवळ भाषण करून निवडणुका जिंकता येत नाहीत तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज असते. मागच्या काळामध्ये केज विधानसभा मतदारसंघासाठी जो काही निधी आणला आहे त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर निधी आणून मला आणखी माझ्या या सर्वसामान्य जनतेचा विकास करायचा आहे. त्यामुळे काही जर हेवेदावे असतील, कुणाकडून काही चुका झाल्या असतील तर त्या बाजूला ठेवून नमिता मुंदडा यांच्यासाठी जीवाचे रान करा, परंतु ज्या मतदारसंघांमध्ये थेट लढत होत आहे त्या मतदारसंघात नमिता मुंदडा यांच्या विजयाचा गुलाल उधळा अशी सादही घातली. तसेच मतदान होइपर्यंत कुणीही कारखान्याला जाऊ नका आणि जे गेले असतील त्या सर्वांना मतदानासाठी घेऊन या अशी विनंतीही केली.
यावेळी मा. खा. डॉ. प्रीतम मुंडे, उमेदवार नमिता मुंदडा भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, त्याचबरोबर संतोष हंगे, विजयकांत मुंडे, विष्णू घुले, पंजाब राजे देशमुख, राणा डोईफोडे, भारत काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान डोंगरपट्ट्यामधील मतदार हा मोठ्या प्रमाणावर मुंडे कुटुंबीयांवर प्रेम करणारा मतदार आहे. त्यामुळे सभेला प्रचंड गर्दी झाली होती आणि मोठ्या प्रमाणावर तरुणांचा उत्साहही दिसून येत होता.