#Election

केज विधानसभा मतदारसंघात “काँटे की टक्कर”….!

8 / 100
केज दि.१७ – विधानसभा निवडणुकीच्या वाजवी प्रचाराला आता अवघे काही तास उरलेले आहेत. प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. आणि आता २० तारखेला उमेदवारांचे भवितव्य मतदान मशीन मध्ये बंद होणार आहे. मात्र केज विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण निवडून येईल ? आणि कुणाचे पारडे जड राहील ? याचा अंदाज मतदारांनाच काय तर राजकीय विश्लेषकांनाही कोड्यात पाडणारा आहे. कारण केज विधानसभा मतदारसंघात काँटे की टक्कर होत आहे.                     विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपा महायुतीच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा तर महाविकास आघाडी कडून राशपचे पृथ्वीराज साठे निवडणुकीच्या मैदानात आहेत. मागच्या तीन ते चार महिन्यांपासून तिकीट जाहीर होण्याच्या अगोदरच या उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे. आणि आता मतदारसंघांमधील विविध ठिकाणी जाऊन शेवटची विनवणी करत आहेत. मतदार संघातील मतदारांचा कौल जर पाहिला तर अनाकलनीय आहे. प्रत्येक जण कोड्यात आणि संभ्रमात बोलतोय आणि दोन्हीही उमेदवार सध्या तुल्यबळ आहेत. विद्यमान आमदार नमीता मुंदडा या जरी मागच्या पाच वर्षात आमदार राहिलेल्या असल्या तरी ३० वर्षांपासून २०१४ चा अपवाद वगळता मुंदडा कुटुंबियाकडेच आमदारकी राहिलेली आहे. त्यामुळे मतदार संघात काही ना काही कामे झालेली आहेत. निधी मतदार संघात आलेला आहे. आणि त्याच कामांच्या जोरावर नमिता मुंदडा या मतदारांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काही ठिकाणी मुंदडा कुटुंबातील काही सदस्यांवर मतदार नाराजी दाखवत आहेत. आमदार कुटुंबीयांनी मतदार संघातील काही मोजकेच कार्यकर्ते आणि काही गुत्तेदार पोसण्याचेच फक्त काम केले असे कांही मतदार बोलताना दिसत आहेत. त्यामुळे मागच्या एवढ्या वर्षांपासून मतदार संघावर पकड जरी असली तरी मुंदडा कुटुंबीयांना प्रचाराची आणि प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून ठीक ठिकाणी पंकजा मुंडे मा. खा. डॉ. प्रीतम मुंडे भेटी देऊन मतदारांना नमिता मुंदडा यांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. एवढेच नव्हे तर नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही प्रचार सभेचे आयोजन केले होते.
            तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार हेही माजी आमदार आहेत. स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या निधनानंतर पोट निवडणूक झाली आणि त्यामध्ये पृथ्वीराज साठे यांना मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल. मात्र त्यांच्या अल्प आमदारकीच्या काळात ठोस असा काही विकास झालेला दिसत नाही. आणि त्यांना त्यावेळी काही भूमिकाही घेता आलेल्या नव्हत्या. पृथ्वीराज साठे हे सर्वसामान्य कुटुंबातील आणि प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारे व्यक्ती म्हणून परिचित जरी असले तरी सध्या ते केवळ सहानुभूतीवर आणि येणाऱ्या काळात राबवण्यात येणाऱ्या विकास कामांच्या जोरावर मते मागताना दिसत आहेत. पृथ्वीराज साठे हे मितभाषी म्हणून परिचित आहेत. परंतु ते आमदार झाल्यानंतर सत्ता केंद्र हे अन्य ठिकाणी राहील की काय ? अशा शंकाही व्यक्त होत आहेत. पृथ्वीराज साठे यांच्या प्रचाराची रणधुमाळीही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गाव खेड्यामध्ये काही प्रमाणात साठे यांच्या बद्दल सहानुभूती आहे. तसेच त्यांच्या प्रचारार्थ विधानसभा मतदारसंघांमध्ये राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्याचबरोबर राजे भूषण सिंह होळकर महाराज आणि आमदार रोहित पवार यांच्या सभा झालेल्या आहेत.
          निवडणूक म्हटलं की प्रचार, प्रसार आणि जाहीर सभा होतच असतात. परंतु विधानसभा मतदारसंघांमध्ये त्या अगोदरच उमेदवार परिचित असतात. आणि आता आपण कुणाला निवडून द्यायचे हेही मतदारांनी ठरवलेले असते. नमिता मुंदडा आणि पृथ्वीराज साठे यांना मतदारसंघांमध्ये समसमान प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक मतदार “आम्ही तुमचेच आहोत” असे म्हणत असल्याने उमेदवारही संभ्रमात आहेत. त्यामुळे मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे ? हे मतदान झाल्याशिवाय लक्षात येणार नाही असा काहीसा सूर सध्या मतदारसंघांमध्ये आहे. राज्यामध्ये जे काही उमेदवार उभे आहेत त्यांच्याबद्दल मतदार असो की राजकीय विश्लेषक असोत आपापला अंदाज बांधतात आणि असलेल्या वातावरणावरून काही अंदाज हे खरेही ठरतात. मात्र केज विधानसभा मतदारसंघांमध्ये कुणाचे पारडे जड ? कोण गुलाल उधळणार ? याचे विश्लेषण भल्याभल्या राजकीय विश्लेषकांनाही करणे अवघड झालेले आहे. दोन्हीही उमेदवार जर तुल्यबळ असतील तर कुणाचं नाणं वाजेल हे सांगणं सध्या तरी कठीण झालेले आहे.
            दरम्यान,  यामध्ये अनेक गणितं मांडली जात आहेत, अनेक उदाहरणे दिली जात आहेत आणि दोन्ही उमेदवाराच्या बाबतीत कोणत्या जमेच्या बाजू आहेत एवढी चर्चा जरी रंगत असली तरी छाती ठोकपणे कोण निवडून येणार ? हे मात्र कुणीही सांगू शकत नाही. आणि अशी तुल्यबळ लढत होत असल्याने विजयी उमेदवार सात ते दहा हजाराच्या फरकानेच गुलाल उधळणार असे अंदाज बांधल्या जात आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close