सध्याच्या खाजगी रुग्णालयातून मिळणाऱ्या महागड्या उपचारपद्धतीमुळे गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्ण स्वस्त आणि खात्रीपूर्वक उपचारासाठी स्वाराती रुग्णालयास प्राधान्य देतात. एका अर्थाने हे रुग्णालय गोरगरिबांसाठी जीवनवाहिनी आहे. मात्र या रुग्णालयात महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधीचा पुरवठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. या प्रकरणी औषधी निरिक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील, मिहीर त्रिवेदी (रा. भिवंडी, जि.ठाणे), द्विती सुमित त्रिवेदी (रा. सुरत) आणि विजय शैलेद्र चौधरी (रा. मिरा रोड ठाणे) या चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी असल्याचे व अनेक राज्यात त्यांचे जाळे पसरले असण्याची शक्यता देखील फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे. पुढील तपास एपीआय कांबळे करत आहेत.गुन्हा दाखल झाला, चौकशी होईल, मात्र आतापर्यंत किती रुग्णांच्या जीवाशी ही बनावट औषधी विपरीत परिणाम करून गेली आहेत त्याची भरपाई कशी होणार ?