ब्रेकिंग
केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको…!
केज दि.१० – तालुक्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे अपहरण करण्यात आले, आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ माजली. मारेकऱ्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झालेली आहेत. मात्र संतोष देशमुख यांच्या गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेतला असून जोपर्यंत मारेकरी अटक होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तर केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड जनसमुदाय एकत्र आला असून रास्ता रोको सुरू केला आहे.
तालुक्यातील संतोष पंडितराव देशमुख यांचे दिनांक ९ रोजी दुपारी तीनच्या दरम्यान केज – बीड रोडवरील टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आले. सदरील घटनाक्रम ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी संतोष देशमुख यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली. तसेच तालुक्यातील टाकळी येथील सुदर्शन घुले याच्यासह अन्य पाच जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र संतोष देशमुख यांचा मृतदेह तालुक्यातील दैठणा परिसरात मिळून आल्याने खळबळ उडाली. सदरील घटना ग्रामस्थांना आणि नातेवाईकांना समजल्यानंतर केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता. आणि एवढेच नव्हे तर मस्साजोग येथील ग्रामस्थांनी राज्य रस्त्यावर ठिय्या मांडत जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत उठणार नाहीत असा पवित्र घेतला होता. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना तात्काळ आरोपी अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री एक वाजता ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते परंतु अद्यापही मारेकरी अटक झाले की नाही ? याची अधिकृत माहिती पोलिसांकडून न मिळाल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थ आक्रमक झाले असून मस्साजोग येथे रास्ता रोको करण्याच्या पावित्र्यात आहेत.तसेच केज व्यापारी महासंघानेही शहर बंदचे आवाहन केले आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी केज व्यापारी महासंघाच्या वतीने ही केज बंदचे आवाहन केले असून शहरातील व्यापाऱ्यांनीही त्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तसेच बीड जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय आज बंद ठेवण्याचे आवाहन सरपंच परिषदेचे राज्यध्यक्ष दत्ता काकडे यांनी केले आहे. त्यामुळे मारेकऱ्यांना अटक करून ग्रामस्थांना शांत करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले असून मारेकरी कधी पोलिसांच्या ताब्यात येतात ? याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत