#Crime
संतोष देशमुख खून प्रकरणातील आणखी एकास केले जेरबंद….!
केज दि.११ – पवनचक्कीच्या वादातून (दि.९) डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे.
प्रतिक भीमराव घुले ( वय २५, रा.टाकळी ता.केज) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर जयराम माणिक चाटे (वय २१ रा.तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता.धारुर) हे अगोदरच पोलिसांनी अटक केलेले आहेत. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रतिक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना केले होते. पोलीस निरीक्षक शेख उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहायक पोलिस निरीक्षक विजय झोनवाल, भागवत शेलार, बप्पासाहेब घोडके, तुषार गायकवाड, चालक मराडे यांनी ही कारवाई केली. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.