ब्रेकिंग
अखेर वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात…..!
बीड दि.३१ – केज तालुक्यातील मस्साजोग येथिल संतोष देशमुख हत्याप्रकरणी केज पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले वाल्मीक कराड अखेर पोलिसांना शरण आले आहेत.
मागच्या नऊ तारखेला केज तालुक्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सदरील प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र ढवळून निघाला. यामध्ये हत्या प्रकरणातील जे सहा आरोपी आहेत त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र अद्याप तीन आरोपी फरार आहेत आणि याच प्रकरणातून वाल्मीक कराड यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड पोलिसांनी वाल्मीक कराडला जेरबंद करण्यासाठी एकूण नऊ पदके वेगवेगळ्या दिशेने शोधार्थ पाठवली होती. मात्र पोलिसांना वाल्मीक कराडचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. मात्र या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली असून वाल्मीक कराड हे पुणे पोलिसांना शरण आले असून तिथून त्यांना बीडला आणण्यात येणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला वेग येणार आहे.
दरम्यान वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्याने धनंजय मुंडे यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर दबाव आलेला असून त्यांच्याही राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र वाल्मीक कराड यांची सखोल चौकशी झाल्यानंतर यामध्ये नेमका कोणाकोणाचा समावेश आहे हे स्पष्ट होईलच. तुर्त वाल्मीक कराड हे पोलिसांच्या ताब्यात आल्याने संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासाला गती येणार असून उर्वरित आरोपीही लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.