#Crime
गावठी पिस्टल बाळगणारा घेतला ताब्यात…..!
अंबाजोगाई दि.५ – जिल्ह्यात शस्त्र परवाना प्रकरण ऐरणीवर असल्याने जिल्हा प्रशासनाने वैध आणि अवैध परवान्यांची पडताळणी सुरू केली आहे. अनेक परवाने रद्द केले असून दहशत निर्माण होऊ नये यावर पोलिसांची करडी नजर आहे. यातच गुप्त माहितीच्या आधारे अंबाजोगाई पोलिसांनी शहरातील मोरेवाडी परिसरात पाण्याची टाकी जवळ गावठी पिस्टल (कट्टा) घेऊन फिरणाऱ्या एकास जेरबंद केले.
पाण्याची टाकी परिसरात श्रीकांत उर्फ बबलू पांडुरंग भोसले (वय ४१, रा. यशवंतराव चव्हाण चौक, अंबाजोगाई) हा गावठी पिस्टल कंबरेला लावून फिरत असल्याची गुप्त माहिती अंबाजोगाई पोलिसांना मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा मारला. यावेळी पोलिसांना पाहून श्रीकांत भोसले पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी पिस्टल जप्त करून श्रीकांत भोसले याच्यावर शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. हि कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक विनोद घोळवे, एपीआय कांबळे, पोलीस कर्मचारी आवले, वडकर, नागरगोजे, काळे यांनी केली.