ब्रेकिंग
एवढी तगडी सुरक्षा असूनही चोर घरात शिरला….!

मुंबई दि.१६ – उच्च दर्जाची सुरक्षा भेदून अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घरात मध्यरात्री एक चोर शिरला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सैफवर हा हल्ला करण्यात आला.
सैफवर हल्ला झाल्यानंतर जेव्हा घरातील इतर सदस्य जागे झाले, तेव्हा चोर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस सध्या चोराचा शोध घेत आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे टीम्स बनवले आहेत. सैफ अली खानला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली.
“सैफवर चोराने चाकूहल्ला केला की त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत सैफ दुखापतग्रस्त झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. आम्ही या प्रकरणी अधिक तपास करत आहोत. या घटनेप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचसुद्धा तपास करत आहे”, असं अधिकारी म्हणाले.
“सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि अनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकू”, असं लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केलं.