
केज दि. १७ – वैद्यकीय क्षेत्राबद्दल सर्रास नकारात्मक सूर लावण्याचे वातावरण आजूबाजूला पाहायला मिळत असतानाच एखाद्या डॉक्टरांचे आपल्या गावात फुलांच्या पायघड्या घालून आणि तोफांची सलामी देत स्वागत केले जाण्याचा प्रकार तसा फिल्मी किंवा स्वप्नवत वाटावा असाच ,पण केज तालुक्यातील ढेंगेवाडी येथे हा प्रसंग प्रत्यक्षात अवतरला. आणि हा सन्मान मिळविणारे डॉक्टर ठरले ते डॉ. दिनकर राऊत.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील घाटेवाडी गावाने दोन दिवसांपूर्वी एक आगळा स्वागत सोहळा अनुभवला. रस्त्यापासून फुलांच्या पायघड्या, सडा सारवण करून सजवलेले अंगण, औक्षण आणि अगदी पाद्यपूजा करण्याची देखील तयारी(ज्याला डॉक्टरांनी नम्रपणे दिलेला नकार ), तोफांची दिली जाणारी सलामी आणि खूप काही. हे सारे काही कोणत्या राजकीय किंवा अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीसाठी नव्हते, तर ते एका वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीसाठी होते, हे आणखीनच आश्चर्याचे. केज तालुक्यात आणि जिल्ह्यातही डॉ. दिनकर राऊत हे बालरोगतज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांनी केजसारख्या ग्रामीण भागातून अनेकांना जीवदान दिले आहेच. तर कोरोनाच्या महामारीच्या वेळी डॉ. दिनकर राऊत यांनी कोरोना सेंटरमध्ये देखील सेवा दिली होती. त्यावेळी घाटेवाडी येथील लिंबाजी ढेंगे त्याठिकाणी रुग्ण म्हणून दाखल झाले होते. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर अत्यंत अस्वस्थ अशा परिस्थितीत, तब्बल २१ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागलेले, फुफुसांची क्षमता जवळपास संपल्यात जमा, त्यातही सुरुवातीला व्हायरेमिया बरा झाला मात्र नंतर इतर तक्रारी उदभवल्या. ज्यावेळी माणूस मानसं ओळखत नव्हता त्यावेळी डॉ. दिनकर राऊत आणि डॉ. हेमा राऊत या दाम्पत्याने लिंबाजी ढेंगे यांच्यासारख्या अनेकांना जीवदान दिले. वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान आणि सेवाभाव कसोटीवर लावून त्यांनी रुग्ण जपले आणि म्हणूनच मग तब्बल तीन वर्षांनी डॉ. दिनकर राऊत आपल्या गावात येणार म्हणून लिंबाजी ढेंगे यांनी त्यांचे आगळेवेगळे स्वागत केले. डॉक्टरांच्या वाट्याला आजकाल चार शब्द आभाराचे देखील येणे अवघड झाले असल्याच्या वातावरणात एका रुग्णाची एका डॉक्टारांप्रती असणारी ही कृतज्ञता म्हणूनच चर्चेचा विषय ठरली आहे.
—————————————–