#Social
आत्महत्याग्रस्त शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियाला 25 हजार रुपयांची मदत…..!

केज दि.२२ – तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी काही दिवसापूर्वी अठरा वर्षे नौकरी करूनही पगार मिळत नसल्याने बीड येथील बँकेच्या समोर गळफास घेऊन आत्महत्या केली.
धनंजय नागरगोजे यांनी तीन वर्षाच्या लहान मुलीला उद्देशून फेसबुक पोस्ट करत स्वतःची जीवन यात्रा संपवली. मयत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना तीन वर्षाची एक लहान मुलगी असून पत्नी ही सहा महिन्याची गरोदर आहे. घरामध्ये वृद्ध आई-वडील आहेत. अशा परिस्थितीमध्ये धनंजय नागरगोजे यांनी अतिशय टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली.त्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. अशा पीडित कुटुंबासाठी मदतीचे हात पुढे येणे गरजेचे आहे आणि त्याच अनुषंगाने ॲड. माधव जाधव यांनी देवगाव ता.केज जिल्हा बीड येथे जाऊन मयत धनंजय नागरगोजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मयत धनंजय नागरगोजे यांचे वडील भानुदासराव नागरगोजे व भाऊ गणेश नागरगोजे यांच्याकडे जय भारती बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान मार्फत 25000 रुपयाचा धनादेश देऊन या कुटुंबाला आधार दिला.
यावेळी ॲड माधव जाधव यांचे सोबत ॲड.रणजीत खोडसे, देविदास नागरगोजे, सुनील घोळवे, शरद मुंडे, अशोक नागरगोजे, सदाशिव मुंडे, ॲड. एस. एल. गलांडे, ॲड. एस. व्ही. गलांडे, ॲड. एम. एल. भोसले, ॲड. पी. डी. इतापे, ॲड. कोनैण काझी, सुग्रीव आप्पा अंबाड व ग्रामस्थ ऊपस्थीत होते.