
केज दि.३ – तालुक्यासह इतरही काही भागात वादळी वारे आणि अवकाळी पावसाने रंग दाखवले.अचानक बदललेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. आणि एवढेच नव्हे तर तालुक्यात वीज कोसळून एका शेतकऱ्यासह गाईला जीव गमवावा लागला.
तालुक्यातील आडस, केकानवाडी भागात वादळी वाऱ्यामध्ये देवीदास शहाजी केकाण (वय ६५ वर्ष) रा. केकाणवाडी हे दुपारी आसरडोह रस्त्याकडील नवरुका शिवारात जनावरे चारीत होते. यावेळी अचानक पाऊस आल्याने ते लिंबाच्या झाडाखाली उभे होते. यावेळी या झाडावर वीज कोसळून शेतकरी देवीदास केकाण जागीच ठार झाले तर एक गाय ही दगावली आहे.
दरम्यान, वेधशाळेने गारपीट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजा प्रमाणे आज दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील आडस परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या घटनेची माहिती तालुका प्रशासन आणि आडस पोलीस चौकीला देण्यात आली आहे.