आपला जिल्हाराजकीय
बीड जिल्हा काँग्रेस कार्यकारणी बरखास्त….!

बीड दि.८ – सध्या महाराष्ट्रात काँग्रेस कडून पक्ष संघटन यावर जोर दिला जात आहे. मागच्या आठवड्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोजित बैठकीमध्ये संघटनात्मक बदल करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी, सर्वच शहराध्यक्ष तसेच पक्षाशी संलग्न सर्वच कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याचे आयोजित बैठकीत बीड चे निरीक्षक अमर खानापुरे, आदित्य पाटील व जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी जाहीर केले.
यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, यापुढे बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुका निहाय जाऊन काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे निरीक्षक अमर खानापुरे, आदित्य पाटील व जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे हे मिटिंग घेऊन नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधून अर्ज करावेत असे आवाहन यावेळी केले. तसेच आजपर्यंत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्या त्या तालुक्यात केलेल्या कामाचा आढावा देखील घेतला जाणार आहे. काँग्रेस पक्षांमध्ये काम करू इच्छिणारे नविन तरुण, जेष्ठ, महिला, युवती यांना देखील संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक बदलात मोठे फेरबदल घडून ज्यांना काम करायची इच्छा आहे व जे पक्षासाठी काम करतील अशा तरुणांना, ज्येष्ठांना व महिलाना संधी मिळणार आहे.
आज आयोजित केलेल्या या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष तालुका कार्यकारणी चे सदस्य, सर्वच शहराध्यक्ष व कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रवीणकुमार शेप यांनी केले.