
केज दि.२७ – आपल्या तालुक्यात, शहरात पाण्याची खूप टंचाई जाणवू लागली आहे. काही ठिकाणी पाणी विकत घेण्याची वेळ आहे अशा या पाण्याचे जतन करणे, बचत करणे व त्याचा योग्य वापर करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्याकडून पाणी कुठे वाया जाते याचा अभ्यास करून त्याचा गरजेनुसारच वापर व्हावा हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे यासाठी जलसाक्षरता होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सहाय्यक अभियंत्या श्रीमती वृंदा नायर यांनी केले.केज शहरातील राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या.
जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025 ता. केज जि. बीड हा कार्यक्रम जलसंपदा विभाग, लघु पाटबंधारे उपविभाग केज व जलसिंचन शाखा केज यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बी. बी. चाटे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर श्रीमती वृंदा अ. नायर -सहायक अभियंता श्रेणी 1,श्रीमती आरती म. झाडबुके -कनिष्ठ अभियंता, श्रीमती वर्षा जाधव -स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व सुरज राजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वृंदा नायर पुढे बोलताना म्हणाल्या की, गोदावरी नदीवर अनेक प्रकल्प नियोजित आहेत ते पूर्ण झाल्यावर पाण्याची बरीच समस्या दूर होऊ शकते.त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशीही संवाद साधला व पाणी टंचाई कशी दूर करता येईल यावर विद्यार्थ्यांना बोलते करत पाण्याचा योग्य वापर, व्यवस्थापन, संवर्धन आणि जागरूकता याची माहिती दिली.यावेळी श्रीमती वर्षा जाधव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पाण्याचे महत्व सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. आपल्याला पिण्यासाठी,विविध घरकामासाठी , शेतीसाठी,उद्योग – धंद्यासाठी पाण्याची खूप गरज आहे. वाढती लोकसंख्या व बदलणारे निसर्गचक्र यामुळे पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा लागणार आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी आपल्याच भागात अडवणे व जिरवणे यातून जमिनीची पाणी पातळी वाढून पाणी संकट दूर होईल.
शाळेतील शिक्षक आर. एस. क्षीरसागर यांनी जल प्रतिज्ञेचे वाचन केले. अध्यक्षीय समारोपात श्रीमती बी. बी. चाटे यांनी बोअर पुनर्भरणाची माहिती सांगितली व मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचलन व्ही. बी. यादव, यांनी केले तर आभार ए. डी. देशमुख यांनी मानले.कार्यक्रम प्रसंगी लघु पाटबंधारे उपविभाग केज येथील अनंत घोळवे, वाय. जे. बडे, अमोल गुंठाळ, संजय वाघमारे, अशोक वैरागे, सुदाम दराडे, पि. पि. पवार, एस. हांगे, एस. बोराडे तसेच शाळेतील शिक्षकवृंद जि. बी. डिरंगे, जे. आर. मस्के, श्रीमती अनिता जाधव, श्रीमती ध्वजा गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.