#Social
आरक्षणासाठी आणखी एका तरुणाने उचलले टोकाचे पाऊल….!
धाराशिव दि.१३ – लातूर जिल्ह्यातील वांगदरी येथील एका तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात आले असे म्हणत मागच्या चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका बंजारा समाजातील तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पवन गोपीनाथ चव्हाण असे आत्महत्या केलेल्या ३२ वर्षीय तरुणाचे नाव आहे.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील नाईक तांडा येथील रहिवासी असलेला पवन चव्हाण हा पदवीधर होता.मात्र योग्य संधी मिळत नसल्याने तो नैराश्यात होता. आणि याच नैराश्यातून बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियर नुसार अनुसूचित जमाती (एसटी) मधून आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून केली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, विविध समाजातील तरुण आरक्षण प्रश्नी आपले जीवन संपवत असल्याने दिवसेंदिवस चिंता वाढू लागल्याने यावर नेमका तोडगा काय निघतो याकडे सर्वसामान्य लोक लक्ष देऊन आहेत.