देशविदेश
असा नाईट क्लब पाहिलाय का कुठे….? जिथे फक्त संस्कृत गाणे गायले जातात…..!
मांसाहार बंदी सुद्धा.......!
डी डी बनसोडे
September 14, 2020
बीड – जगाच्या पाठीवर अनेक देश आणि अनेक परंपरा आणि सांस्कृतिक गोष्टी विसावलेल्या आहेत. प्रत्येक देशात अश्या काही विलक्षण गोष्टी घडतात त्या सर्वच आपल्याला माहीत असतीलच असे नसते.
दरम्यान नाईट क्लब हे आता विशेष कौतुकाचे राहिलेले नाहीत कारण जगभरात त्यांचे जणू पेव फुटले आहे. नाच, गाणी यांचा रात्रभर धिंगाणा येथे सुरु असतो. भारतातील बहुतेक नाईटक्लब मध्ये बॉलीवूड किंवा हिंदी, पंजाबी, इंग्लिश गाणी म्हटली जातात आणि त्यावर रात्रभर डान्स केले जातात. नाईटक्लब मध्ये बहुतेक तरुणाईचीच गर्दी असते.भारतापासून दूर म्हणजे सुमारे १५९१७ किमी दूर असलेल्या अर्जेंटिना मध्ये मात्र एक अनोखा नाईट क्लब आहे. देशाची राजधानी ब्युनोस आयर्स मध्ये हा नाईटक्लब असून त्याचे नाव आहे ‘द ग्रोव्ह.’ या नाईटक्लब मध्ये दररोज सरासरी ८०० लोक येतात. याचे वैशिष्ट म्हणजे येथे भारतात गीर्वाण सुंदरी म्हणजे देवांची भाषा असा मान असलेल्या संस्कृत भाषेतील गाणी, भजने म्हटली जातात आणि नाईटक्लब मध्ये येणारे याच गाण्यांवर नृत्य करतात. जगात या प्रकारचा हा एकमेव क्लब आहे.
२०१२ मध्ये भारताचे अर्जेंटिना मधील तत्कालीन राजदूत विश्वनाथन यांनी या क्लबला भेट दिली होती. ते सांगतात, या क्लब मध्ये गणेश शरणम, गोविंदा गोविंदा, जय जय राधे रमण हरी बोल, जय कृष्ण हरे अशी गीते गायली जातात आणि त्यावर नृत्य केले जाते. या क्लब मध्ये दारू, सिगरेट, अमली पदार्थांना बंदी आहेच पण मांसाहारी पदार्थांवर सुद्धा बंदी असून येथे फक्त शाकाहारी पदार्थच मिळतात.
येथे संस्कृत गाण्याच्या तालावर योग सुद्धा केला जातो. त्याला योगा पार्टी म्हटले जाते. येथे मंत्र उच्चारण, ध्यान, योग, संगीत, नृत्य यांच्यातून देह आणि आत्मा यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला जातो.