आरोग्य व शिक्षण
केज शहरात बालकांच्या उपचारासाठी मोठी सुविधा
योगिता बाल रुग्णालयात सरकारी योजना कार्यान्वित
डी डी बनसोडे
September 20, 2020
केज दि.20 – सर्वसामान्य लोकांना आता बालकांच्या आजारासंदर्भात काळजी करण्याची गरज नसून केज शहरातील डॉ.दिनकर राऊत यांच्या बालरुग्णालयात प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित झाल्या असून एका लाभार्थ्याला या योजने अंतर्गत लाभ सुद्धा मिळाला आहे.
सरकारच्या वतीने सर्वसामान्य लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत.या योजना सरकारी दवाखान्यात उपलब्ध असल्या तरी सर्वच खाजगी रुग्णालयात त्या सुविधा उपलब्ध नसल्याने लोकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र जे नावाजलेले व सर्व सोयीनेयुक्त असे खाजगी दवाखाने आहेत त्यांना या योजना लागू करण्यात येतात.आणि याच पार्श्वभूमीवर केज शहरातील डॉ.दिनकर राउत यांच्या योगिता बाल रुग्णालयात दोन्हीही जन आरोग्य योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पिवळे, केशरी व अन्य योजनेत बसणाऱ्या पालकांना तसेच १४ अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला पांढरे शीधा पत्रिका धारकानाही प्रतिवर्षी दीड लाख व किडनी प्रत्यारोपनासाठी प्रतिवर्षी अडीच लाखांपर्यंत लाभ मिळणार असून यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे.त्यामुळे आता आपल्या बालकांवर पाच लाखापर्यंत च्या खर्चाचा उपचार मोफत करून घेता येणार आहे.
सदरील योजनेसाठी पालकांना बालकांच्या जन्माचा दाखला, पालकांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून विलाज करणे सोपे झाले आहे. आणि सदरील योजना कार्यान्वित झाल्यानंतर केज शहरातील फरिदोदीन हकिमोदिन इनामदार (१३) या बालकाला डेंग्यू आजारातून बरे झाल्यानंतर या योजने अंतर्गत एक रुपयाही न भरता सुट्टी देण्यात आली आहे.
सदरील योजनेमुळे तालुक्यातील ज्या पालकांना इतरत्र जावे लागत होते ते आता जाण्याची गरज नसून अडचणीत असलेल्या पालकांच्या बालकांवर सदरील योजनेतून उपचार करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याची संधी उपलब्ध झाल्याची भावना बालरोग तज्ञ डॉ.दिनकर राऊत यांनी व्यक्त केली.