महाराष्ट्र

पतीच्या खुनाचा तपास सीबीआयकडे द्या म्हणत मातेचा दोन मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न…..!

पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

दोन मुलांसह मातेचा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामसोर आत्मदहनाचा प्रयत्न

पतीच्या खुनाचा तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

अंबाजोगाई : केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांच्या खुन प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा यासह विविध मागण्यासाठी मयताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह शुक्रवारी (दि.०२) दुपारी १२ च्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांनी सतर्कता दाखवत लागलीच हस्तक्षेप करून या तिघांनाही ताब्यात घेतले.

लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांचा १७ जुलै रोजी खून झाला. या प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्याचा आरोप करत मयताची पत्नी मोहर लाड यांनी गृहमंत्र्याकडे आत्मदहनाची तक्रार केली. त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. विविध वृत्तपत्रांमधून आत्मदहनाच्या इशाऱ्याच्या बातम्या देखील आल्या. शुक्रवारी (दि.०२) मयताची पत्नी मोहर, ऋषीकेश (वय १४), शुभम (वय १२) हे तिघे जण लाडेवडगाव येथून सकाळी अंबाजोगाईला निघाले. इशाऱ्याचा पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण चौकातच पोलीसांनी बंदोबस्त लावला होता. तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत रस्त्यावर साध्या वेशात पोलीस तैनात केले होते. परंतु सदरील महिलेने आपल्या दोन मुलांसह मुख्य रस्ता व चौक वगळुन मोरेवाडीतून एका बोळीतून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली. प्रवेशद्वारावर तिघांच्या हातात असणार्‍या डिझेलने भरलेल्या बाटल्या अंगावर ओतुन घेत तिघांनीही एकच टाहो फोडला. तैनात असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत तत्काळ हस्तक्षेप करून तिघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीसात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

मोहर लाड यांनी सामुहिक आत्महत्या करणार असल्याचे निवेदन नुकतेच दिले होते. त्या निवेदनात मयत बाबासाहेब लाड यांचा मोबाईल रक्ताने माखलेले कपडे व जागेचा पंचनामा, पंचनाम्याची प्रत खुन करण्यासाठी वापरलेले हत्यार, लोखंडी सळ्या, गज, पोलीसांनी जप्त केल्या नाहीत. २६ जुलै रोजी एकाच ठिकाणी तीन आरोपी संशयास्पद सापडले आहेत. मयत लाड यांच्या फोनवरील कॉल डिटेल्स व मोबाईल नंबरची पडताळणी झाली नाही. या आरोपीतील एक आरोपी पोलीस कर्मचार्‍याच्या समोर औषध प्राशन करून स्वारातीत अ‍ॅडमिट होतो हे संशयास्पद आहे. खुनाचा तपास युसुफवडगाव पोलीसाकडून काढून तो सीआयडी मार्फत करावा अशी मागणी करत आज तिघा जणांनी अपर पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पोलिसांच्या सर्तकतेमुळे अनर्थ टळला 

मोहर लाड या दोन मुलांसह गांधी जयंती दिनी अपर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सिद्धार्थ गाडे यांनी अधीक्षक कार्यालय ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्यावर साध्या वेशात पोलीस तैनात करून आत्मदहन रोखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. तरी देखील बंदोबस्तातील पोलीसांना गुंगारा देवून सदरील महिलेने अधीक्षक कार्यालयासमोरील बोळीतून कार्यालयात पळ काढला व अंगावर डिझेल ओतून घेतले. मात्र महिला पोलीसांनी लागलीच तिला आणि मुलांना ताब्यात घेतले.

मला जगण्याची इच्छा नाही 

माझे पती कपडे शिवण्याचा धंदा करत होते. त्यांच्यावर आमच्या घराची उपजिविका भागायची परंतु त्यांचाच खून झाल्यामुळे माझ्या जगण्याला अर्थ नाही असे म्हणत मोठ्याने अधीक्षक कार्यालयातच मोहर लाड यांनी टाहो फोडला. त्यामुळे प्रत्येकाची मने हेलावली.

तपास योग्य रितीने केला 
बाबासाहेब लाड खून प्रकरणाचा तपास युसूफवडगाव पोलीसांनी योग्य रितीने केला असून संबंधीत खुनातील आरोपी अटक करण्यात आले आहेत. त्यांचे दोषारोपपत्र देखील तयार झाले आहे. त्याची व्यवस्थित पडताळणी काम करणे सुरू आहे. युसुफवडगाव पोलीसांनी तपासातील कुठलाही भेदभाव केला नाही.
– स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close