केज दि ८ : तालुक्यातील आडस येथील राघू उत्तम काळे (वय-२२) या तरूणाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. कामानिमित्त बाहेरगावी गावी असलेला हा तरूण लाॅकडाऊन काळात गावी आला होता. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
तालुक्यातील आडस येथील राघू काळे हा घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने गोवा राज्यात कंपनीत कामाला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे कंपनी बंद करण्यात आली. हाताला काम नसल्याने त्याला गावी येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गावी येऊन तीन-चार महिन्याचा कालावधी झाला होता. तो कांही दिवसांनंतर परत जाण्याच्या तयारीत होता. मात्र बुधवारी रात्री उशीरा साडेअकराच्या गावातील बाजार समितीच्या उपबाजारपेठेत सुरू असलेल्या बांधकामात स्वत:च्या शर्टाने गळफास लावून आत्महत्या केली. घरच्या लोकांनी शोध घेतला असता त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती पोलीसांना देताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. त्याच्या मृतदेहावर गुरूवारी दुपारी दोन वाजता अंबाजोगाई रस्त्यावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.