दिवसभरातील ठळक बातम्या
???? जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. या देशांवर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली. मुंबईत देखील नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ही दुसरी लाट आली तर तिचा सामना करण्याची तयारी पालिकेच्या आरोग्य विभागाने केली असून 50 हजार अतिरिक्त खाटा, आयसीयू तसेच ऑक्सिजन खाटांची तयारी करण्यात आली आहे.
???? सोमवारी राज्यात एकूण ९,९०५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर राज्यात आजपर्यंत एकूण १४,७०,६६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती समोर आली आहे. ही एकंदर आकडेवारी पाहता यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२ % एवढे झाले आहे. सोमवारी राज्यात ३,६४५ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
???? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात येणार आहे. संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे रामदास आठवले यांचे आवाहन केले आहे. आज सकाळी रामदास आठवले यांनी कोरोनाची चाचणी केली होती कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
???? केंद्राच्या नव्या आणि तितक्याच महत्त्वाच्या निर्णयानुसार यापुढं देशातील कोणत्याही व्यक्तीला जम्मू- काश्मीर आणि लडाख भागात जमीन खरेदी करुन तेथे स्थायिक होता येणार आहे. पण, शेतजमिनीवर असणारी बंदी मात्र येथे कायम ठेवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पुनर्गठन अधिनियमाअंतर्गत हा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे.
???? राष्ट्रीय महामार्गांशी राज्य रस्ते जोडण्यासाठी एडीबीकडून १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
???? टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्यात मुंबईचा रोहित शर्मा या स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. रोहितला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये वगळण्यात आले आहे. या टीम इंडियात काही युवा खेळाडूंनाही स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
???? देशातील अनलॉक ५ च्या गाईडलांईनची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतची घोषणा गृह मंत्रालयाने केली आहे. 30 सप्टेंबरला ही गाईडलाईन जारी करण्यात आली होती. यामुळे कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यंत सुरुच राहणार आहे.
???? मुंबईत छोटया ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाऊ शकतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ अतंर्गत कारवाई होऊ शकते.
???? सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या खडंपीठासमोर आज झालेल्या युक्तीवादात, सुरुवातीला खंडपीठाने ही सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. त्यानंतर पुन्हा युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली. याचिकाकर्त्यांनी यादरम्यान घटनापीठाकडे आपलं म्हणणं मांडावं असंही कोर्टाने नमूद केलं.
???? बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपला. या प्रचार सभेत तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप बाजी मारणार का की तरुण नेतृत्व तेजस्वी यादव काय चमत्कार करणार याची मोठी उत्सुकता आहे. पहिल्या टप्प्यातील उद्या मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात ७१ जागांसाठी मतदान होणार आहे.
???? पाकिस्तानच्या पेशावरमधील एका मदरशाजवळ स्फोट झाला आहे. दिर कॉलनीत असलेल्या मदरशाजवळ झालेल्या स्फोटात ७ बालकांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक जण जखमी झाल्याचं वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिलं आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू झालं आहे. जखमी बालकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे. यातील अनेक बालकांची प्रकृती गंभीर आहे.