रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक
केंद्रीय मंत्री अमित शहा व प्रकाश जावडेकर यांची टीका
मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आलीये. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आलीये.
अलिबागमध्ये राहणाऱ्या इंटिरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान पोलिसांकडे यासंदर्भात कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिक चॅनलकडून करण्यात आलाय. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झालेत.
अर्णब गोस्वामी यांना पोलीस पकडून घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांवर मारहाण केल्याचे गंभीर आरोप लावलेत. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची टीका…….!
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यावरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेसप्रणित आघाडीकडून महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, पुन्हा एकदा त्यांनी लाज आणल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करत आहे. तसेच हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे, असं अमित शहांनी म्हटलं आहे.
या कृत्यानं पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण करून दिली आहे. मुक्त प्रेसवरील हल्ला असून त्याचा प्रतिकार केला जाईल, असंही अमित शहा यांनी स्पष्ट केलंय.
या घटनेनंतर केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.
यासंदर्भात प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केलंय. महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत असल्याचं जावडेकर यांनी म्हटलंय.
प्रकाश जावडेकर म्हणतात, महाराष्ट्रात माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. ही माध्यमांसोबत वागण्याची पद्धत नाही. ही घटना आम्हाला आणीबाणीच्या काळाची आठवण करून देते, त्या काळात माध्यमांना या प्रकारची वागणूक देण्यात येत होती.