सध्या सर्वत्र नदी ओढ्यात माशांचे प्रमाण असल्याने तरुण वेगवेगळ्या पध्दतीने मासेमारी करतात. नदीत विजेचे करंट सोडून मासेमारी करण्याचा जीवघेणा प्रकार रात्री समोर आला. तालुक्यातील भोगलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या काळ्याचीवाडी येथे या प्रकारातून दोन तरुणांचा जीव गेल्याची घटना घडली. अंधार पडला असताना दोघे घरी परत आले नसल्याने शोध घेत असताना सदरील प्रकार उघड झाला. पाण्यात करंट सोडून मासे धरत असताना त्याच पाण्यात उतरलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात समाधान सहदेव रुपनर व दिपक मारुती रुपनर या दोन अठरा ते वीस वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. सदरील प्रकारामुळे ऐन दिवाळीत रुपनर कुटूंबियावर व गावावर दुखाचा डोंगर कोसळला असुन गावात शोककळा पसरली आहे. सदरील तरुणांचे प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असुन धारुर पोलीस पुढील तपास करत आहेत.