उमरी (ता. केज) येथील मनीषा बाबासाहेब मुळे या आपल्या कुटुंबासह कोल्हापूरला वास्तव्यास असून त्या ६ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुलीस माहेरी खर्डेवाडी येथे जाण्यासाठी केजच्या बसस्थानकावर आल्या होत्या. त्या बसस्थानाकातून अंबाजोगाई – भिवंडी या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने १ लाख ८० हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅमचे सोन्याचे साखळी गंठण, तीन सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. मनीषा मुळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसऱ्या घटनेत चिंचोलीमाळी (ता. केज) येथील मनीषा प्रदीप घोडके या ७ मे रोजी सकाळी ११ वाजता आपल्या सासू व नणंदसह अंबाजोगाईला लग्न कार्यास निघाल्या होत्या. सकाळी ११.३० वाजता येथील बसस्थानकातून छत्रपती संभाजीनगर – लातूर या बसमध्ये चढत असताना त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ५० हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे सोन्याचे मनीमंगळसुञ अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत लंपास केले. त्यांनी केज ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, बसस्थानकातून दागिने आणि पैसे चोरण्याची ही पहिली वेळ नाही तर सरासरी १५ दिवसांत एक घटना मागच्या कित्येक वर्षांपासून घडत आहे.मात्र अद्यापही पोलिसांना यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही.त्यामुळे प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन बसमध्ये चढाव उतरावं लागत आहे. बीड पोलिसांकडून मोठमोठे गुन्हे उघडकीस येत असताना केज पोलिसांना हे का जमत नाही हे एक कोडेच आहे.