मुंबई – राज्यात गेल्या महिन्यात पार्टीच्या पावसाने हाहाकार घातला होता. त्यामुळे हाताशी आलेलं सोन्यासारखं पीक देखील वाहून गेलं. कोरोना काळातील टाळेबंदीमुळे बिघडलेलं आर्थिक चक्र, बोगस बियाणं, कीड, अतिवृष्टी अशा संकटाचा सामना करत टिकवलेलं पीक देखील परतीच्या पावसामुळे शेतातील मातीसह वाहून गेल्यामुळे पुन्हा कसं उभं राहायचं असा प्रश्न निर्माण झाला असतानाच आता आणखी एका संकटाची भर पडत आहे.
येत्या दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवाळी आधी आलेली थंडी अचानक गायब झाली असून सद्या पुन्हा दमट हवामान राज्यातील अनेक जिल्ह्यात निर्माण झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात दक्षिण-पश्चिम पूर्व भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तापमानात वारंवार वाढ होत आहे. यामुळे पुढील 48 तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्टयात होणार आहे. त्यानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या सुमारास हा पट्टा ओमानच्या दिशेने पुढे सरकेल.या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. याबरोबरच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीच्या प्रभावामुळे राज्यातील तापमनात वाढ झाली असून थंडीचा कडाका कमी झाले. त्यामुळे रोज अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये अजूनही नागरिकांनी गर्मीचा सामना करावा लागत आहे. तर, मनमाड, चांदवड भागात पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच सतर्कता बाळगून शेतातील पिके सुरक्षित ठिकाणी ठवावेत जेणेकरून नुकसान होणार नाही, असं आवाहन देखील करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कोरड्या जागी ठेवावा.